आशा भोसले यांच्याशी संबंधित आशय प्रसारित केल्याबद्दल पाकिस्तानच्या माध्यम नियामक प्राधिकरणाने (पीईएमआरए) ‘जिओ न्यूज’ या देशातील सर्वांत मोठ्या ‘मीडिया हाउस’ला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. संबंधित चॅनेलने भारतीय गाणी आणि भारतीय चित्रपटांमधील दृश्ये प्रसारित केल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी पत्रकार आणि मानवी अधिकार कार्यकर्त्यांनी माध्यमांच्या गळचेपीविरोधात आवाज उठवला आहे. युद्ध आणि संघर्षाच्या काळात कला आणि कलाकार यांचा बळी दिला जाऊ नये, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. आशा भोसले यांचे रविवारी मुंबईत निधन झाले. भारताप्रमाणेच भोसले यांचे चाहते पाकिस्तानातही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे तेथेही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ‘डॉन’ या वृत्तपत्राने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या एका लेखात ‘आशा भोसले यांचा आवाज आणि संगीत सीमेची बंधने ओलांडून कोट्यवधी पाकिस्तानी चाहत्यांच्या हृदयाला स्पर्शून गेले,’ असे नमूद केले आहे. या श्रद्धांजलीपर लेखामध्ये आशाताईंचे पाकिस्तानशी असलेले ऋणानुबंध आणि त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या आशा पोस्ले (Asha Posley) या पाकिस्तानी अभिनेत्रीमुळे निर्माण झालेल्या गोंधळाचे किस्सेही शब्दबद्ध केले आहेत.
‘ही नोटीस हास्यास्पद’
बहुसंख्या पाकिस्तानी पत्रकार आणि विविध समुदायातील मंडळींनी या नोटिशीचा निषेध केला असून, हा प्रकार हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानी पत्रकार अजहर अब्बास यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये ‘पाकिस्तानमध्ये एखाद्या महान कलाकाराबद्दल बातमी देताना त्यांच्या कार्याचे पुनरावलोकन करणे आणि त्याचा गौरव करणे ही नेहमीच एक प्रथा राहिली आहे. आशा भोसले यांच्यासारख्या महान गायिकेच्या कालजयी आणि अविस्मरणीय गाण्यांचा पाकिस्तानातही मोठा चाहता वर्ग आहे. त्या स्वतः पाकिस्तानच्या दिग्गज गायिका नूर जहाँ यांच्या चाहत्या होत्या. त्यांना आशाजी प्रेमाने आपली मोठी बहीण मानत असत. त्यांनी नुसरत फतेह अली खान यांच्यासोबत काम केले आणि नासिर काझमींसारख्या महान उर्दू कवींच्या कवितांना आपल्या आवाजाने जिवंत केले,’ असेही नमूद केले आहे.







