अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम झाल्यानंतरच्या पहिल्याच दूरध्वनी संभाषणात, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य-पूर्वेकडील परिस्थिती आणि द्विपक्षीय सहकार्यावर मंगळवारी चर्चा केली. सुमारे ४० मिनिटे चाललेल्या संभाषणादरम्यान दोन्ही नेत्यांनी अनेक मोठ्या करारांसोबतच हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित ठेवण्यावरही संवाद साधला.
‘भारत आणि अमेरिका सर्वच क्षेत्रांमध्ये आपली धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यासाठी कटिबद्ध आहेत’, असे पंतप्रधान मोदी यांनी दूरध्वनी संभाषणांनंतर सोशल मीडियवरील पोस्टमध्ये नमूद केले. ‘माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मला फोन आला. विविध क्षेत्रांमधील आमच्या द्विपक्षीय सहकार्यात साध्य झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचा आम्ही आढावा घेतला. सर्वच क्षेत्रांमध्ये आमची सर्वसमावेशक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही पश्चिम आशियातील परिस्थितीवरही चर्चा केली. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवण्याबाबच मंथन केले’, असेही त्यांनी यात म्हटले आहे.





