दुसऱ्या दिवशीही हिंसक आंदोलन

महाराष्ट्र टाइम्स

नोएडात पोलिसांकडून लाठीमार

Maharashtra Times

नोएडातील कामगारांना तीन हजार रुपयांपर्यंत वेतनवाढ देण्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारने सोमवारी रात्री उशिरा आहे. एका उच्चस्तरीय समितीने रात्री कामगारांसोबत बैठक घेतली. त्यानंतर सरकारने मध्यरात्री १.३०च्या सुमारास समितीच्या शिफारशींना मंजुरी देणारा आदेश जारी केला. घोषित करण्यात आलेली पगारवाढ १ एप्रिलपासून लागू होईल.

गौतम बुद्धनगर जिल्ह्यातील नोएडामध्ये विविध कारखान्यांतील कामगारांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी हिंसक आंदोलन सुरू ठेवले. जमावाने दोन-तीन ठिकाणी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली. पोलिसांनी काही ठिकाणी लाठीमार करून आंदोलकांना पांगवले.

नोएडा-ग्रेटर नोएडातील औद्योगिक परिसरात अनेक कारखान्यांतील हजारो कामगारांनी सोमवारी विविध भागांमध्ये केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यामुळे अनेक भागांत भीषण वाहतूककोंडी झाली. सकाळीच सुमारे ४२ हजार कामगार रस्त्यावर उतरले. त्यांनी मारुती उद्योगासह ३५०हून अधिक ठिकाणी दगडफेक व तोडफोड केली, ६०हून अधिक वाहने जाळली, १५० वाहनांचे आणि सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान केले. पोलिस आणि निमलष्करी दलाचे जवान सोमवारपासून औद्योगिक क्षेत्रांमध्ये ध्वजसंचलन करत आहेत. ठिकठिकाणी सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे पाळत ठेवली जात आहे. याव्यतिरिक्त, पीएसी आणि आरएएफच्या १५ कंपन्या आणि २६ अधिकारी (आठ अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एसपी) आणि १८ डीएसपी) नोएडा येथे तैनात करण्यात आले आहेत. या आंदोलनामुळे नोएडातील बहुतेक कंपन्या दुसऱ्या दिवशीही बंद राहिल्या. सेक्टर-१२१मधील कारखान्यातील कामगारांनी दुसऱ्या दिवशीही पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला.

‘प्रत्येक आवाजाकडे

दुर्लक्ष केले गेले’

नोएडाच्या रस्त्यावर जे घडले, ती देशातील कामगारांची शेवटची हाक होती अशी टीका काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. तर, भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनीही नोएडातील कामगारांची मजुरी खूप कमी आहे, याला दुजोरा दिला.