अमेरिका-इराणमध्ये पुन्हा चर्चा?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पाकिस्तानकडून उच्चस्तरीय प्रयत्न; गुरुवारी इस्लामाबादमध्ये भेटीची शक्यता

Maharashtra Times

इराण आणि अमेरिका यांच्यात वाटाघाटीच्या चर्चा सुरू राहाव्यात, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी केले आहे. तसेच युद्धविराम पूर्णपणे पाळलाच पाहिजे यावर त्यांनी भर दिला आहे. ‘खोलवर रुजलेल्या मतभेदांमुळे रातोरात करार होऊ शकत नाही आणि करार होण्यासाठी चर्चा रचनात्मक पद्धतीने सुरू ठेवणे आवश्यक आहे’, असे ते म्हणाले.

युद्धकोंडी फुटून शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी गेल्या आठवड्यात अमेरिका आणि इराणमध्ये पाकिस्तानात झालेली चर्चेची पहिली फेरी अपयशी ठरली. मात्र, आता अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा एकदा वाटाघाटींसाठी चर्चा व्हावी, यासाठी पाकिस्तानच्या उच्चस्तरावरून संपर्क साधण्यात येत आहे. पुढील आठवड्यापर्यंत इस्लामाबादमध्ये उभय देशांत दुसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी भेट होण्याची शक्यता आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील रखडलेल्या वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी पाकिस्तानकडून संपर्क करण्यात येत आहे. 'द एक्स्प्रेस ट्रिब्यून' या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, २१ एप्रिलला, दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची मुदत संपण्यापूर्वी ही चर्चा पुन्हा होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, उपपंतप्रधान इशाक दार आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर हे दुसऱ्या फेरीची चर्चा निश्चित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या दोन्ही देशांच्या नेतृत्वामध्ये गेल्या आठवड्याच्या अखेरीस ४७ वर्षांनंतर पहिल्यांदाच थेट वाटाघाटी झाल्या होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार, वाटाघाटींची पुढील फेरी उद्या, गुरुवारी इस्लामाबादमध्ये पार पडू शकते. याच दिवशी पाकचे पंतप्रधान शहबाज हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. शहबाज हे सौदी अरेबिया आणि तुर्की या देशांचा दौरा करणार आहेत.

‘अमेरिकेने इराणला आपली अंतिम आणि सर्वोत्तम ऑफर सादर करूनही, इराणच्या बाजूने युद्ध थांबवण्यासाठी वॉशिंग्टनने ठेवलेल्या अटी स्वीकारण्यात आल्या नाहीत’, असे इस्लामाबादमधील वाटाघाटींमध्ये अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी म्हटले.