कृषी साहित्य विक्रेत्यांचा बेमुदत बंद

Contributed byनाशिक|महाराष्ट्र टाइम्स

महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स, सीड्स डीलर असोसिएशनने आजपासून बेमुदत बंद पुकारला आहे. खत कंपन्यांकडून होणारी अनावश्यक उत्पादने विकण्याची सक्ती थांबवावी, एचटीबीटी कापूस बियाण्यांच्या विक्रीवर कडक निर्बंध घालावेत या प्रमुख मागण्या आहेत. खरिपाच्या हंगामापूर्वी कृषी केंद्रे बंद राहिल्यास शेतकऱ्यांना बियाणे व खते मिळणे कठीण होईल. शासनाने दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

agricultural supplies dealers indefinite strike a challenge for farmers

महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स, सीड्स डीलर असोसिएशन (माफदा) संघटनेने आजपासून (दि. २७) बेमुदत बंद पुकारला आहे. नाशिकसह राज्यभरातील सुमारे ८५ हजार विक्रेते यात सहभागी होणार आहेत.

खत कंपन्यांकडून खतांचा पुरवठा करताना इतर अनावश्यक उत्पादने विकण्याची सक्ती (लिंकींग) केली जाते, ती त्वरित थांबविण्यात यावी, परराज्यांमधून मोठ्या प्रमाणावर एचटीबीटी कापूस बियाणे हे अनधिकृत पद्धतीने राज्यात आणले जाते. या बियाण्यांच्या विक्रीवर कडक प्रतिबंध घालण्यात यावा आणि संभाव्य खत टंचाई व खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खत वितरणाच्या कार्यपद्धतीत केल्या जाणाऱ्या बदलांबाबत संघटनेशीही चर्चा करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसह वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला आहे.

राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या गेल्या चार-पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ‘माफदा’ने केला आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.पावसाळ्याच्या तोंडावर आणि खरिपाच्या पूर्वतयारीच्या काळात कृषी केंद्रे बंद राहिल्यास शेतकऱ्यांना बियाणे व खते मिळणे कठीण होईल. शासनाने दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.