दुरवस्थेची लपवाछपवी

Contributed byत्र्यंबकेश्वर|महाराष्ट्र टाइम्स

त्र्यंबकेश्वर शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी नदीपात्रांची दुरवस्था लपवण्यासाठी प्रशासनाने पडदे लावले. अहिल्या आणि गोदावरी नदीपात्रातील अस्वच्छता दिसू नये यासाठी हे प्रयत्न केले गेले. गौतम तलावाच्या तुटलेल्या घाटांवरही नेट लावले गेले. कोट्यवधी रुपये खर्च होऊनही सांडपाणी व्यवस्थेत सुधारणा न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाची ही धडपड चर्चेचा विषय ठरली.

दुरवस्थेची लपवाछपवी
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यादरम्यान त्र्यंबकेश्वर शहरातील नदीपात्रांची दुरवस्था लपवण्यासाठी प्रशासनाने पडदे लावल्याची बाब चर्चेत आली आहे. अहिल्या आणि गोदावरी नदीपात्रात सोडले जाणारे सांडपाणी, काळेशार पाणी, चिखल आणि अस्वच्छता अभ्यागतांच्या नजरेस पडू नये यासाठी पुलांच्या दोन्ही बाजूंना रस्त्याच्या कडेने पांढरे पडदे लावण्यात आले होते. गौतम तलावाच्या तुटलेल्या घाटांवर हिरवे नेट लावून तेही झाकण्यात आले. प्रशासनाने केलेली ही केविलवाणी धडपड शहरात मात्र चर्चेची बाब ठरली.

शनिवारी (दि. २५) गोदावरी-नर्मदा जलयात्रेच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री त्र्यंबकेश्वर येथे आले होते. त्यांचे हेलिकॉप्टर नया उदासीन आखाड्याजवळील हेलिपॅडवर उतरले. तेथून ते थेट त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले आणि नंतर स्वामी समर्थ गुरुपीठ येथे पोहोचले. या संपूर्ण मार्गावर वाहनताफ्यासाठी विशेष कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. रस्त्यांवरील खड्डे माती टाकून बुजवण्यात आले, तसेच दोन्ही बाजूंना भगवे आणि पिवळे झेंडे लावण्यात आले होते. गोदावरीचे जल नर्मदेत नेण्याचा उपक्रम स्तुत्य असला, तरी आधी गोदावरी आणि अहिल्या नदीपात्र स्वच्छ ठेवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. शहरातील पर्यावरणप्रेमींनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या नजरेस मंदिर परिसरातील अर्धवट पाडलेली दुकाने आणि अस्ताव्यस्त स्थिती पडू नये म्हणून त्यांना मंदिराच्या मागील दरवाजाने आत नेण्यात आल्याची चर्चा आहे. या दौऱ्यात दर्शनपथाचे भूमिपूजन प्रस्तावित हाेते; मात्र ते शक्य झाले नाही. त्याचे कारणही प्रशासनाने स्पष्ट केले नाही.

कोट्यवधींचा खर्च,

तरीही परिस्थिती जैसे थे

त्र्यंबकेश्वरातील सांडपाणी व्यवस्थेवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. २००२ मध्ये सुमारे तीन कोटी रुपयांचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला; मात्र तो कार्यक्षम ठरला नाही. २०१५ मध्ये सांडपाणी वाहून नेण्यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च झाले, पण त्यातूनही अपेक्षित परिणाम साधला गेला नाही. २०२२ मध्ये दोन कोटी रुपयांचा फॅब्रिकेटेड एसटीपी उभारण्यात आला, तरीही नदीपात्रात सांडपाणी जाणे थांबलेले नाही. याशिवाय ३९ कोटी रुपयांच्या भुयारी गटार आणि एसटीपी योजनेचे काम अद्याप अपूर्ण आहे, तर आता नव्याने २८ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.