शेतजमिनी भाडेतत्त्वावर

Contributed byनिफाड,शेतकरी|महाराष्ट्र टाइम्स

पुढील वर्षी होणाऱ्या नाशिक सिंहस्थासाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. भाविकांच्या सोयीसाठी कसबे सुकेणे रेल्वेस्थानक परिसरात तात्पुरते बसस्थानक आणि वाहनतळ उभारले जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भाडेतत्त्वावर घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या कामांमुळे परिसरातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होणार आहे. रेल्वेस्थानकावरही विकासकामे वेगाने सुरू आहेत.

शेतजमिनी भाडेतत्त्वावर
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

पुढील वर्षी होणाऱ्या नाशिक सिंहस्थासाठी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन भाविकांसाठी तात्पुरते बसस्थानक आणि वाहनतळ उभारण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू आहेत. त्यासाठी कसबे सुकेणे रेल्वेस्थानक परिसरात शेतकऱ्यांच्या जमिनी भाडेतत्त्वावर घेण्यास प्रशासनाने पावले उचलली असून, त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत.

देशभरातून भाविक रेल्वेने नाशिक येथे सिंहस्थासाठी दाखल होतील. रेल्वेने येणाऱ्या भाविकांना नाशिक किंवा त्र्यंबकेश्वरकडे जाण्यासाठी कसबे सुकेणे रेल्वेस्थानक हे सोयीचे ठिकाण आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या जागेची आवश्यकता आहे. महसूल विभाग आणि परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच रेल्वेस्थानक परिसरातील जमिनींची प्राथमिक पाहणी केली आहे. यामध्ये स्थानकापासून जवळ असलेल्या शेतजमिनींना प्राधान्य दिले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिंहस्थाच्या कालावधीसाठी या जमिनी ताब्यात घेतल्या जातील. यासाठी जमिनीचा वापर केल्याबद्दल शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसार योग्य भाडे देण्यात येणार आहे. सिंहस्थानिमित्ताने होणाऱ्या या कामांमुळे आणि नियोजनामुळे कसबे सुकेणे परिसरातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होणार आहे. रस्ते रुंदीकरण, पथदीप आणि स्वच्छता याकडेही लक्ष दिले जाणार आहे.

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सोयीचे रेल्वेस्थानक असल्याने कसबे सुकेणे रेल्वे स्थानकावर सुमारे १३६ कोटींहून अधिक रुपये खर्च करून विकासकामे सुरू आहेत. रेल्वे स्थानकावर नवीन फलाट, तिन्ही फलाटांवर प्रतीक्षालय, इलेक्ट्रिक इंटरलॉक सिग्नल व्यवस्था, एआय आधारित सिग्नल, पादचारी उड्डाणपूल, जलकुंभ, सुसज्ज व स्थानकाची अद्ययावत इमारत, होल्डिंग एरिया, स्वच्छतागृहे, कर्मचारी निवासस्थाने अशी विविध कामे सुरू आहेत.