त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकराज मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या अनवाणी भाविकांची उन्हामुळे होरपळ होत आहे. मंदिराच्या दक्षिण दरवाजाने बाहेर पडलेले भाविक लक्ष्मी नारायण चौक ते मंदिराचा पूर्व दरवाजा भागात जेथे पादत्राणे काढलेले असतात तेथपर्यंत तापलेल्या रस्त्यावरून अनवाणी चालताना त्यांची पावले होरपळत आहेत. देवस्थान ट्रस्टने या परिसरात मॅट टाकणे, पाण्याचे फवारे सोडणे आवश्यक असून, लहान मुले वयोवृद्धांचे अधिक हाल होत आहेत.
मुसळगाव अपघातातील मृतांची संख्या तीनवर
सिन्नर : शिर्डी-सिन्नर मार्गावरील मुसळगाव शिवारात शनिवारी (दि. २५) दुपारी झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. गंभीर जखमी वैभव रामदास शिंदे (२७, रा. खैरख, जि. बुलढाणा) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापूर्वी संकेत प्रकाश खोसे (२५, रा. चिखली, जि. बुलढाणा) आणि श्रीकिसन हनुमान सुरोसे (३६, रा पाटोदा, जि. बुलढाणा) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. अशोक लेलंड ट्रक (एमएच-१५-केएस-५१५२) चालकाने गतीरोधकावर अचानक ब्रेक लावल्याने मागून येणारी मारुती सुझुकी सियाझ (जीजे-०५-जेएस-६१५४) ट्रकवर आदळली. धडकेनंतर कारमधील तिघेही गंभीर जखमी झाले होते.









