ध्वजारोहणाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Contributed byत्र्यंबकेश्वर|महाराष्ट्र टाइम्स

त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याला भव्य स्वरूप देण्याची तयारी सुरू आहे. पुरोहित संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा केली. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सुरू होणाऱ्या या सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह मान्यवरांना आमंत्रित करण्याचा प्रयत्न आहे. ध्वजारोहणाचे नियोजन आणि दिल्लीतील संपर्कासाठी मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली आहे.

ध्वजारोहणाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

शहरात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याला भव्य स्वरूप देण्यासाठी पुरोहित संघाने तयारी सुरू केली आहे. शनिवारी (दि. २५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले असता, पुरोहित संघाचे अध्यक्ष आणि मंदिर ट्रस्टचे विश्वस्त मनोज थेटे यांनी त्यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केली. सिंहस्थ कुंभमेळा पर्वकाळ ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सुरू होणार असून, ध्वजारोहण आणि अमृतस्नानासह विविध धार्मिक कार्यक्रमांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

४ मे २०२६ रोजी ध्वजा शिलान्यास, तर सप्टेंबर २०२६ मध्ये ध्वजस्तंभ पूजन होणार आहे. त्या दिवशी मुख्यमंत्री उपस्थित राहू शकणार नसले, तरी ध्वजारोहणाच्या नियोजनासाठी मदत करण्यास आणि दिल्लीत संपर्क साधण्यास त्यांनी सहमती दर्शवली आहे. गोदावरी घाटावर सिंहस्थ २०१५ मधील ताम्रध्वजा पताका लावली जाणार असून, कुशावर्तावर कापडी ध्वज उभारला जाणार आहे. पर्वकाळ नसताना हा ध्वज अर्ध्यावर ठेवला जाईल, तर पर्वकाळात पूर्ण उंचीवर फडकवला जाणार आहे.