मुलुंडमध्ये एलबीएस रोडवर मेट्रोच्या पुलाचा कठडा कोसळण्याच्या घटनेवरून काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी लक्ष्य केले. ‘या घटनेने भाजपच्या ‘विकासाची’ पोलखोल केली आहे. मुलुंडच्या घटनेत एकाचा मृत्यू, तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. युती सरकारमध्ये सर्वत्र भ्रष्टाचार सुरू असून कठडा कोसळण्याची घटना निकृष्ट बांधकामाचे उदाहरण आहे. तथाकथित विकासपुरुष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची जबाबदारी घ्यावी’, अशी मागणी आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
‘महायुती सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून, तो आता नागरिकांच्या जिवावर उठला असल्याचे मुलुंडमधील या घटनेने पुन्हा दाखवून दिले आहे. मेट्रोची कामे लोकवस्तीच्या ठिकाणी होत असताना सुरक्षेची काळजी का घेतली जात नाही? कामाचा दर्जा आणि सुरक्षेकडे सरकार बघणार आहे की नाही? फक्त कंत्राटदारावर कारवाई करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. जसे श्रेय घेता तसेच भाजप महायुती सरकारने जबाबदारीही घ्यायला हवी’, असे सपकाळ म्हणाले.
‘संबंधित मंत्र्यावर कारवाई करा’
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनीही या प्रश्नावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. ‘भाजप महायुती सरकारमध्ये विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार प्रचंड बोकाळला आहे. सत्ताधारी भाजप महायुतीच्या टक्केवारीचा खेळ मुंबईकरांच्या जिवावर बेतत आहे. ‘इन्फ्रामॅन’ म्हणून पीआरगिरी करणाऱ्यांनी मुलुंडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पुलाचा भाग कोसळून झालेल्या घटनेची जबाबदारी घ्यावी. कारवाईचे नाटक करू नये. एमएमआरडीए व संबंधित खात्याच्या मंत्र्यांवरच कारवाई करावी’, अशी मागणीही केली.






