‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने जगातील ३८ राष्ट्रांसोबत भारताच्या मुक्त व्यापार करारांची वाटचाल सुरू झाली असून, जगातील व्यापारक्षेत्राचा ७० टक्के भाग आपल्या देशासाठी खुला झाला आहे. सर्वतोपरी लाभदायक ठरणाऱ्या या करारांतून देशाचे संपूर्ण हित जपले जाईल व शेतकरी वा अन्य कोणत्याही क्षेत्राच्या हितास बाधा येणार नाही’, अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी दिली. ‘भारत आपल्या हिताशी कोणतीही तडजोड करणार नाही’, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
भाजप प्रदेश कार्यालयाच्या मुख्यालयात गोयल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘पंतप्रधान मोदी यांच्या विकसित भारत संकल्पाच्या पूर्ततेमध्ये आता कोणतीही शक्ती बाधा आणू शकणार नाही’, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
‘जागतिक व्यापारक्षेत्रातील संधींचे दरवाजे भारतासाठी खुले होत असल्याने, अन्य कोणत्याही देशाच्या तुलनेत आपल्याला या करारांचा अधिक लाभ होणार आहे. देशातील शेतकरी, दूध, जीएम फूड यांना या करारातून वगळून शेतकऱ्यांचे हित जपले जात आहे.
अन्य क्षेत्रांतील उत्पादनांना जगाच्या पाठीवरील नव्या बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याची अभूतपूर्व संधी या करारांमधून मिळणार आहे. यामुळे निर्यात, रोजगार आणि गुंतवणूक क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे’, असे गोयल म्हणाले.
‘पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाच्या अमृतकाळात विकसित भारताची वाटचाल अधिक बलशाली करणारे महत्त्वाचे पाऊल केंद्र सरकारने अर्थसंकल्पाद्वारे टाकले आहे. या माध्यमातून तीन नवे केमिकल पार्क, टेक्स्टाइल पार्क, विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करणारे प्रकल्प, ‘सबका साथ सबका विकास’ धोरणानुसार देशातील प्रत्येक नागरिकाचा विकास, या कर्तव्यभावनेतून अर्थसंकल्पाची मांडणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्राला या नीतीचा मोठा फायदा होणार आहे’, असेही त्यांनी नमूद केले. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, अतुल शाह, राजेश शिरवाडकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.
काँग्रेसमध्ये नैराश्य दाटले आहे. जनतेमध्ये संभ्रम पसरवण्याखेरीज त्यांच्याकडे कोणतीही ठोस योजना नाही, कोणतेही प्रस्ताव नाहीत आणि अपप्रचार फैलावून केंद्र सरकारवर टीका करण्याखेरीज कोणता मुद्दादेखील नाही. त्यामुळेच खोटे पसरवून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम या पक्षाकडून केले जात आहे’, अशी टीका गोयल यांनी केली.






