महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील पवित्र सण. देवाधिदेव महादेवाचा हा दिवस शहरात अत्यंत भक्तिमय वातावरणात रविवारी साजरा करण्यात आला. आयुष्यातील दुःख, अडचणी, समस्या दूर व्हावी, या भावनेतून भाविकांनी आपापल्या परीने महादेवाची उपासना केली. याप्रसंगी सर्वांच्या उद्धाराचे साकडे भोळ्या शंकराला घालण्यात आले.
संपूर्ण शहरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्राचीन शिव मंदिर बेलीशॉप, कल्याणेश्वर मंदिर महाल, मानकापूरचे प्राचीन शिवमंदिर यासह अन्य मंदिरांमध्येही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. नंदनवन कॉलनी येथील श्री लक्ष्मीनारायण देवस्थानमधील ५१ फूट उंच मूर्तीच्या दर्शनाकरिता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. येथे जोडप्यांच्या हस्ते लघुरुद्राभिषेक झाला. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे कॉलनी बेलीशॉप मंदिरात सकाळी ब्रह्म मुहूर्तावर भगवान शंकराचा सामूहिक रुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर हवन व आरती करून मंदिर परिसर भाविकांना दर्शनासाठी खुला करण्यात आला. विविध संस्था, संघटनांद्वारे जागोजागी फराळाच्या खाद्यपदार्थांचे वितरण करण्यात आले. काही ठिकाणी डीजेच्या तालावर भक्तिगीते लावून नृत्य करण्यात आले. घरोघरी महादेवाला बेल अर्पण करत पूजा, अर्चना करण्यात आली. चंदननगर येथील श्री शिवगौरी नागनाथ मंदिर सेवा ट्रस्टतर्फे दिवसभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महादेवाची अतिशय प्राचीन आणि स्वयंभू मंदिरे शहरात आहेत. ती सर्व भाविकांसाठी श्रद्धेय असल्याने, महाशिवरात्रीचा उत्सव या मंदिरांमध्ये साजरा करण्यात आला. अभिषेक, पूजा, भजन, कीर्तन, जागरण, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंदिरांमध्ये दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची गर्दी दिसून आली. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले. नागपुरातील सर्वात प्राचीन असे आठशे वर्षांचा इतिहास असलेले भुतेश्वर शिवमंदिर हे जागृत देवस्थान आहे. येथे दिवसभर भजन, कीर्तन सुरू होते. मोक्षधाम घाटावरील अर्धनारीनटेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव धार्मिक वातावरणात साजरा झाला.






