अलिबागमधील जमीन मोजणीच्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नागरिकांकडून झालेल्या विरोधाचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टिकेला नार्वेकर यांनी रविवारी नागपुरात प्रत्युत्तर दिले. ‘खासदार राऊत हे जमीन घोटाळ्यात कारागृहात जाऊन आले असून, जनता ते विसरलेली नाही. राऊतांनी त्यांच्याकडे असलेल्या सर्व चित्रफिती दाखवाव्यात. त्यावर चोख प्रत्युत्तर देण्यात येईल’, असा आक्रमक पवित्रा नार्वेकर यांनी घेतला.
अलिबाग प्रकरणामध्ये राऊत यांनी त्यांच्याकडे आणखीही चित्रफिती असल्याचा दावा करत नार्वेकरांच्या राजीनाम्याची मागणी केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना नार्वेकर म्हणाले, ‘राऊत यांना अफवा पसरवायला आवडतात. अलिबागमध्ये आमच्या कुटुंबाचे १५० वर्षांपासून वास्तव्य असून जमीनही आहे. त्यामुळे अलिबागला वारंवार जाणे असते. माझे गाव व शेती असल्याने ती बघायला तिकडे गेलो होतो. त्यावेळी गावातील दोन लोकांमध्ये वाद होताना दिसला. मी तिकडे गेलो. ‘तुम्ही मारामारी करू नका, जो काही वाद आहे, तो शांतपणे बसून सोडवा’, असे सांगितले. ज्याठिकाणी तो वाद सुरू होता त्याच्याशी माझे काहीही देणे घेणे नाही.’
राऊत यांच्याकडून राजीनाम्याची मागणी करण्यात आली असल्याबद्दल विचारले असता नार्वेकर म्हणाले, ‘मी राजीनामा द्यावा, अशी त्यांची जुनी इच्छा आहे. त्यामुळे ते कोणता ना कोणता आरोप करून राजीनाम्याची मागणी करतात. त्यांनी जे आरोप केलेत, ते बिनबुडाचे आहेत.’
भारताचे संविधान हे विश्वातले सर्वात उत्कृष्ट संविधान आहे. त्याबाबत कोणत्याही प्रकारे वादग्रस्त बोलणे उचित नाही. कुणालाही या संविधानाच्या बाबत अधिक माहिती द्यायची असेल, बोलायचे असेल तर लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्यायला पाहिजे, असा टोलाही नार्वेकर यांनी एमआयएमचे वारिस पठाण यांना लगावला.






