सरगम संगीत अकादमीतर्फे आयोजित ‘ अभंग सरगम ’ या सांगीतिक उपक्रमात बालगायकांच्या निरागस स्वरांनी सजलेली भक्तिमय संगीतरजनी रंगली. अकादमीच्या पाच बालगायकांनी गायिलेल्या सुरेल भक्तिगीतांनी अयोध्यानगर श्रीराममंदिराचा परिसर निरामय भक्तिरसात न्हाऊन निघाला.
या कार्यक्रमाचा शुभारंभ प्रसिद्ध गायक आणि प्रेरक वक्ते कैलाश तानकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. त्यानंतर तेजस्विनी कोमलकर व अंजली वानखेडे यांनी सरस्वतीवंदना सादर केली. ‘जय जय राम राम कृष्ण हरी’च्या गजराने कार्यक्रमाला प्रारंभ झाल्यावर अकादमीचे पाच बालकलावंत स्वरा पवार, भक्ती नरुले, श्रुती रायटर, स्वरांगिनी गडेकर आणि सान्वी बोरकुटे यांनी अनेकानेक अभंगांचे आणि भक्तिगीतांचे प्रभावी सादरीकरण केले. ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘उठ पंढरीच्या राजा’, ‘पांडुरंग ध्यानी’, ‘रखुमाई रखुमाई’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘अवघे गर्जे पंढरपूर’, ‘रूपे सुंदर सावळा गे माई’, ‘ये गं ये गं विठाबाई’, ‘धरिला पंढरीचा चोर’, ‘सांगा मुकुंद कुणी हा पाहिला’, ‘मनमोहन मुरलीवाला’, ‘किती सांगू मी सांगू’, ‘अबीर गुलाल’ यासोबतच देवीच्या विविध गोंधळांचा मॅशअप या गीतांचा समावेश होता. अकादमीतील ७०च्या वर विद्यार्थी आणि अयोध्यानगर परिसरातील नागरिक कार्यक्रमाला श्रोते म्हणून उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे संगीत संयोजन सरगम संगीत अकादमीचे सूत्रधार व संचालक भरत नरुले यांनी केले होते.
अनुभवी तबकावादक धर्मेंद्र माहुरकर यांनी उत्तम साथसंगत केली. कार्यक्रमाचे सहजसुंदर आणि अभ्यासपूर्ण असे निवेदन वृषाली तांबडे यांनी केले. बालकलावंत सोहम नरुले यानेही तबल्यावर तसेच डाॅ. संजय भक्ते यांनी टाळांवर साथसंगत केली.
कार्यक्रमाला संगीत अकादमीचे विद्यार्थी आणि परिसरातील भक्त-भाविक मोठ्या संख्येत उपस्थित होते.






