काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आंदोलन केल्यानंतर रविवारी सकाळी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. गोंधळात एकूण नऊ जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली.
सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. भाजप कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी आंदोलन केले. पुण्यात रविवारी ‘पतित पावन संघटने’ने आंदोलन केले. भाजपने काँग्रेस भवनासमोर आंदोलन केले. त्या वेळी भाजप कार्यकर्ते व नंतर काँग्रेस कार्यकर्तेही काँग्रेस भवन परिसरात जमले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली. पोलिस बंदोबस्त असतानाही परिस्थिती चिघळून दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
‘दंगली घडवायच्या आहेत’
मुंबई : ‘माझ्या वक्तव्याची मोडतोड करून ‘ध’चा ‘मा’ करून भाजपला राज्यात दंगली घडवायच्या आहेत, याचा प्रत्यय पुण्यात आला,’ अशी प्रतिक्रिया देऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, की भाजप माझ्या वक्तव्याला हिंदू-मुस्लिम रंग देऊन खतपाणी घालत आहे. पुण्यातील भाजपचे गुंड पुणे काँग्रेसच्या कार्यालयावर चाल करून आले व दगडफेक करून काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांसह पत्रकार भगिनींवर प्राणघातक हल्ला केला. भाजपच्या या गुंडगिरीचा आम्ही तीव्र निषेध करतो. पुणे पोलिसांनी दंगलखोर भाजप गुंडांना चिथावणी देणाऱ्या धीरज घाटे आणि महापौर मंजूषा नागपुरे यांच्यासह भाजपच्या दंगखोरांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत.
उर्वरित मजकूर... २, ५






