वागळे इस्टेटमधील शांतीनगर भागात ३० ते ३५ वर्षे जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे घडली. या पडझडीत इमारतीमधील तीन रहिवाशी जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या २४ तासांत वागळे इस्टेटमध्ये इमारतींची पडझडीची ही दुसरी घटना आहे.
शांतीनगर येथील हनुमान मंदिराजवळ नूतन नीलम अपार्टमेंट ही पाच मजली इमारत असून या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील स्लॅब चौथ्या मजल्यावर कोसळला. यावेळी गजेंद्र प्रसाद (६०) यांच्या उजव्या खांद्याला फ्रॅक्चर व शरीराला दुखापत झाली. प्रिन्स यादव (२५) यांना उजव्या पायाला फ्रॅक्चर आणि शरीराला दुखापत झाली असून प्रदीप यादव (२३) यांच्या दोन्ही पायांना व शरीराला दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पालिकेचे उपायुक्त गजानन गोदापुरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांच्यासह अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. या टीमने जखमींना उपचारासाठी नजीकच्या गंगुबाई शिंदे रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. यातील प्रदीप यादव यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आहे.
दुर्घटनाग्रस्त इमारत सी टू बी (इमारत रिकामी न करता संरचनात्मक दुरुस्ती करणे.) या प्रवर्गात येत असून इमारतीमध्ये एकूण २६ सदनिका आहेत. त्यात अंदाजे ८५ ते ९५ रहिवासी राहतात. इमारत धोकादायक असल्याने सुरक्षेतेच्या कारणास्तव ही इमारत पूर्णतः रिकामी करण्यात आली आहे. इमारतीमधील रहिवाशांची तात्पुरत्या स्वरूपात शांतीनगर येथील ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक - ३८ मध्ये वास्तव्यकरिता पाठवण्यात आले आहे. या इमारतीमधील ए विंग व बी विंग सीलबंद केली आहे. .








