गट नोंदणीच्या शेवटच्या दिवशी , मंगळवारी (१७ फेब्रुवारी) शिवसेना पक्षाच्या तेरा नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांच्या समोर गटनोंदणी केली. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या गटाचे नगरसेवक किशोर नागरे यांची गटनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली. गट नोंदणीनंतर सर्व नगरसेवक महापालिकेत आले, पण पालकमंत्री गटाच्या नऊ नगरसेवकांनी उपमहापौरांच्या दालनात जाणे टाळले.
महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महिनाभरात राजकीय पक्षांना आपल्या नगरसेवकांची गटनोंदणी विभागीय आयुक्तांकडे करणे बंधनकारक आहे. शिवसेना वगळता अन्य पक्षांनी गट नोंदणी केली होती. शिवसेनेच्या तेरा नगरसेवकांमध्ये दोन गट पडल्यामुळे गटनोंदणी लांबणीवर पडली. तेरा पैकी नऊ नगरसेवक पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गटाचे तर चार नगरसेवक उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या गटाचे आहेत.
उपमहापौरपदासाठी संजय शिरसाट यांची त्यांच्या गटातील नगरसेवकाच्या नावाला पसंती होती, पण पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी त्यांना डावलून राजेंद्र जंजाळ यांना उपमहापौरपदासाठी उमेदवारी दिली आणि जंजाळ विजयी झाले. या निवडणुकीत शिंदे यांनी शिरसाट यांना धक्का दिला. त्यामुळे शिरसाट यांच्या गटातील नगरसेवकाला गटनेता केला जाईल असे मानले जात होते. शिरसाट यांनी गटनेतेपदासाठी नगरसेवक त्र्यंबक तुपे यांचे नाव पुढे केले होते. परंतु एकनाथ शिंदे यांनी राजेंद्र जंजाळ यांच्या गटाचे किशोर नागरे या नगरसेवकाच्या नावाला पसंती देत पुन्हा एकदा पालकमंत्री शिरसाट यांना डावलले.
शिवसेनेचे निरीक्षक विलास पारकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी शिवसेना गटाची नोंदणी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या समक्ष करण्यात आली. या वेळी सर्वच्या सर्व तेरा नगरसेवक उपस्थित होते. गटनोंदणीनंतर सर्व नगरसेवक महापालिकेत आले. या वेळी शिरसाट गटाच्या नगरसेवकांनी उपमहापौरांच्या दालनात जाणे टाळले.








