शिवजयंतीच्या कार्यक्रमात भेट देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकांची विक्री वाढली आहे. ग्रामीण भागातील उत्सव समित्यांनी एकत्रित पुस्तक खरेदी केली आहे. शिवजयंतीनिमित्त पुस्तकांच्या नवीन आवृत्त्या बाजारात आल्या आहेत. ५० रुपये ते २०० रुपये किमतीच्या पुस्तकांची विक्री अधिक आहे. ‘शिवाजी कोण होता’, केळुसकर गुरुजी, यदुनाथ सरकार लिखित शिवचरित्राची मागणी वाढली आहे, असे ‘साकेत बुकवर्ल्ड’चे विक्रेते सचिन तरटे यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरात साजरी करण्यासाठी जोरदार पूर्वतयारी सुरू आहे. शिवजयंतीनिमित्त कपडे, झेंडे, पुतळे, सजावटीच्या वस्तू, पुस्तके आणि मिरवणूक साहित्याच्या बाजारपेठेत मोठी उलाढाल सुरू आहे. दोन दिवस शिवप्रेमींनी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली आहे. जिल्ह्यात तीन ते चार लाख झेंड्यांची विक्री झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती गुरुवार, १९ फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे. शहरात शिवजन्मोत्सव सोहळा सुरू आहे. विविध संस्था, संघटना आणि मंडळांनी शिवजयंतीनिमित्त सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले आहेत. यंदा शिवजयंती डिजे आणि लेझरमुक्त साजरी करण्याचा निर्णय जिल्हा शिवजयंती महोत्सव समिती आणि पोलिस प्रशासनाने जाहीर केला आहे. त्यामुळे पारंपरिक वाद्ये आणि लेझीमच्या तालावर मिरवणुका निघणार आहेत. शिवजयंतीच्या खरेदीसाठी शहरासह ग्रामीण भागातून नागरिकांची वर्दळ वाढली आहे. त्यातून बाजारपेठेत उलाढाल वाढली आहे. शहरात झेंड्यांची निर्मिती वाढली आहे. ‘जिल्हाभरात तीन ते चार लाखापेक्षा अधिक झेंडे विकले गेले आहेत. यंदा शिवजयंतीला झेंड्यांची मागणी वाढली आहे,’ असे ‘महालक्ष्मी कंपनी’चे संचालक प्रदीप काथार यांनी सांगितले. किमान चार रुपये ते कमाल ३५० रुपये झेंड्याची किंमत आहे. घरांवर आणि वाहनांवर झेंडे लावण्यासाठी खरेदी करण्यात येत आहे.
शिवाजी महाराजांचे चित्र असलेल्या टी-शर्ट, भगवे आणि पांढऱ्या कुर्त्यांची मागणी वाढली आहे. घोषवाक्य लिहिलेल्या टी-शर्ट तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. भगवे फेटे आणि कुर्ता-पायजमा यांची विक्री वाढली आहे. सध्या ३०० ते ५०० रुपये दरातील कुर्ते विक्री झाली आहेत, असे विक्रेत्यांनी सांगितले. बिल्ले, पोस्टर, चित्र, पुतळे यांचीही विक्री वाढली आहे. तीनशे ते चार हजार रुपये किंमत असलेल्या फोटो फ्रेम मोठ्या संख्येने बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. चांदी, पितळी मखरातील मुर्तींची मागणी आहे. काही शिवप्रेमींनी आकर्षक मूर्ती ऑनलाइन मागविल्या. ढोलपथक, लेझीमपथक आणि झांजपथक कला कौशल्य दाखवणार आहेत. त्यामुळे पैठण गेट परिसरातील दुकानात ढोल-दुरुस्ती आणि विक्री सुरू आहे. सेव्हन हिल्स, क्रांती चौक, टीव्ही सेंटर चौक परिसरात २०० रुपये ते १२ हजार रुपये दराने लहान-मोठ्या आकारातील पुतळ्यांची विक्री होत आहे.









