उन्हाळ्याची चाहूल लक्षात घेऊन महापौर समीर राजूरकर यांनी मंगळवारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये, नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे, पाणी पुरवठ्यातील गॅप कमी व्हावा यासाठी २५ फेब्रुवारीपर्यंत सविस्तर आराखडा सादर करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्यातील गॅप कमी करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करणे गरजेचे आहे, त्यासाठी बैठक आयोजित करण्याचा आदेश महापौरांनी प्रशासनाला दिला होता. त्यानुसार आयुक्त जी. श्रीकांत यांनी मंगळवारी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला महापौर समीर राजूरकर यांच्यासह उपमहापौर राजेंद्र जंजाळ, आयुक्त जी. श्रीकांत, पाणी पुरवठा विभागाचे समन्वयक ए. बी. देशमुख, के.एम. फालक , कार्यकारी अभियंता वसंत भोये, किरण धांडे, अनिल तनपुरे आदी उपस्थित होते.
शहराचा पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी ९०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी तातडीने टाकण्यात आली. या जलवाहिनीतून ७५ एमएलडी पाणी मिळणे अपेक्षित असताना केवळ २५ एमएलडी पाणीच मिळत आहे असा उल्लेख करुन महापौरांनी ७५ एमएलडी पाणी केव्हा मिळणार असा सवाल अधिकाऱ्यांना केला.यावर खुलासा करताना आयुक्त म्हणाले, या जलवाहिनीवर फारोळा येथे २६ एमएलडी क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र बांधण्यात आले आहे, त्यामुळे २५ एमएलडी पाणी शहराला मिळते.
‘अडचणीवर मात करून, ा पाणीपुरवठा केला जात आहे. हे वेळापत्रक बदलण्यासाठी, नो नेटवर्क भागाला पाणी देण्यासाठी नगरसेवकांनी प्रशासनावर दबाव आणू नये,’ असे आवाहन आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले.








