भारतात उत्तम अंतराळवीर घडवण्याच्या हेतुने देशातील पहिल्या-वहिल्या नागरी ॲनालॉग अंतराळवीर प्रशिक्षण मोहिमेचा नुकताच श्रीगणेशा झाला. याच विशेष प्रशिक्षण मोहिमेचे यशस्वी नेतृत्व शहरातील आदिती देशपांडे यांनी 'क्रू कमांडर' म्हणून केले. ' इस्रो 'चे अधिकृत अंतराळ प्रशिक्षक (स्पेस ट्युटर) 'आका स्पेस स्टुडिओ'च्या माध्यमातून गुजरातच्या धोलावीरा येथे ही विशेष मोहीम पार पडली. यानिमित्ताने नागरी ॲनालॉग अंतराळवीर प्रशिक्षण मोहिमेवर शहरातील तरुणीने खास मोहोर उमटवली, हे विशेष.
प्रत्यक्षातील अंतराळ मोहिमेसाठी सर्वार्थाने सज्ज करण्यासाठी पृथ्वीवर तसेच वातावरण तयार करुन अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यात येते आणि अशा प्रशिक्षणाला 'ॲनालॉग ॲस्ट्रोनॉट ट्रेनिंग' म्हटले जाते, तर विद्यार्थी व संशोधकांना दिल्या जाणाऱ्या आणि अभ्यास-संशोधन हा मुख्य हेतू असलेल्या प्रशिक्षणाला 'सिव्हिलियन ॲनालॉग ॲस्ट्रोनॉट ट्रेनिंग' म्हटले जाते. तर, अशाच नागरी ॲनालॉग अंतराळवीर प्रशिक्षणाला भारतात सुरुवात झाली व ही सुरुवात गुजरात येथील 'रण ऑफ कच्छ'चा भाग असलेल्या धोलावीरा येथे झाली. याच ठिकाणी आका स्पेस स्टुडिओच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जात आहे आणि आदिती देशपांडे यांनी सात दिवसांच्या प्रशिक्षण मोहिमेचे क्रू कमांडर म्हणून नेतृत्व केले. त्याआधी आदिती यांनी 'मोवस्टा' या भारतीय संस्थेच्या माध्यमातून रशियातील मॉस्को येथे स्पेस कॅम्पमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तिथे त्यांनी जगप्रसिद्ध 'युरी गागरीन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर'ला भेट देऊन अंतराळवीरांच्या प्रशिक्षणाची व रशियन तंत्रज्ञानाची सखोल माहिती घेतली. हा अफलातून अनुभव त्यांनी भारताच्या पहिल्या नागरी मोहिमेत कमांडर म्हणून वापरला. याच नागरी अंतराळवीर प्रशिक्षण मोहिमेत सूक्ष्म गुरुत्वाकर्षण (मायक्रोग्रॅव्हिटी) स्थितीत ध्वनी लहरींचा वापर करुन वनस्पतींच्या वाढीच्या वेगाचा अभ्यास केला, हेही विशेष उल्लेखनीय. याच प्रशिक्षण मोहिमेत आदिती यांच्यासोबत आदित्य पंड्या, ॲनी भल्ला, अनुष्का राठोड यांनीही सहभाग घेतला होता.
बंदिस्त वातावरण, अल्प साधने
नागरी ॲनालॉग अंतराळवीर प्रशिक्षण कालावधीत संपूर्ण आठवडाभर बंदिस्त राहावे लागतेच; शिवाय अत्यल्प साधन-सामुग्रीत भागवावे लागते. कमीत कमी पाण्याचा वापर करावा लागतो आणि पाण्यात उकळून तयार होईल, अशा प्रकारच्या पदार्थांचा आहारात अधिक समावेश असतो. त्याचवेळी रोजच प्राणवायू, रक्तदाब, रक्तशर्करा तपासली जाते व त्याची जबाबदारी १७ वर्षीय आदित्यवर होती. सर्व सदस्यांच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेण्याची व सर्वांचे मानसिक संतुलन राखण्याची जबाबदारी अनुष्का यांच्यावर होती. तर, ॲनी यांनी परग्रहिय वाहन चलनाचे निकष सांभाळत क्रू ला त्याबद्दल प्रशिक्षण दिले. अर्थातच, बाहेरच्या जगाशी पूर्णपणे संपर्क तोडून व बंदिस्त राहून प्रशिक्षण कालावधी पूर्ण करावा लागतो, असेही आदिती यांनी सांगितले.
आदिती देशपांडे यांनी पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयातून आयटी विषयात पदवी पूर्ण केली असून, गेल्या १६ वर्षांपासून त्या पुण्यात आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. केवळ औत्सुक्यातून अंतराळ मोहीम समजून घेण्यासाठी व अभ्यास-संशोधन करण्याच्या हेतुने नागरी अंतराळवीर प्रशिक्षण पूर्ण केल्याचे आदिती यांनी सांगितले.








