‘हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांना उत्तर देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कृती आवश्यक असून ‘ मुंबई क्लायमेट वीक ’ हा त्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. हवामान बदलावरील कृती कार्यक्रमाचे नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार आहे. हवामान कृती ही केवळ पर्यावरणीय जबाबदारी नसून भविष्यातील आर्थिक स्पर्धात्मकतेची किल्ली आहे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.
‘मुंबई क्लायमेट वीक’च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘मुंबईसारख्या किनारी महानगराला हवामान बदल ाचा फटका बसत आहे. अतिवृष्टीमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणे, घरे पाण्याखाली जाणे, व्यवसाय ठप्प होणे आणि उपजीविकेवर परिणाम होणे, ही परिस्थिती वारंवार दिसते. उष्णतेच्या लाटांचा परिणाम बांधकाम कामगार, फेरीवाले आणि शेतकरी यांच्यावर होत आहे. ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे कापणी केलेली पिके नष्ट होतात, ज्याचा मोठा आर्थिक व सामाजिक परिणाम होतो. त्यामुळे हवामान बदल हा आज प्रशासनासमोरील गंभीर प्रश्न बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक विकास आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा समतोल साधण्याचा मार्ग स्वीकारला आहे’. कार्यक्रमाला केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी, राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे, ‘प्रोजेक्ट मुंबई’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, मुंबईच्या महापौर रितू तावडे आदी मान्यवर उपस्थित होते.








