अशोकचक्रापासून प्रेमप्रकरणापर्यंत...

महाराष्ट्र टाइम्स

वझे-केळकर महाविद्यालयात महाराष्ट्र टाइम्सने 'शोध युवा प्रतिभेचा' ही स्पर्धा आयोजित केली. विद्यार्थ्यांनी कथा, कविता आणि एकपात्री प्रयोग सादर केले. पहिल्यांदा प्रेमात पडलेल्या मुलाची कथा, जिवलग मैत्री, समुद्राचे वर्णन, कपड्यांवरून मिळणारी वागणूक आणि अशोकचक्राची व्यथा यांसारख्या विषयांवर सादरीकरण झाले. निशांत रेडीज आणि मनस्वी लगाडे अंतिम फेरीत पोहोचले. प्रा. आदित्य दवणे आणि प्रा. अमोल पवार यांनी परीक्षणाची जबाबदारी सांभाळली.

अशोकचक्रापासून प्रेमप्रकरणापर्यंत...
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

पहिल्यांदाच प्रेमात पडलेल्या मुलाची कथा, जिवलग मैत्री, समुद्राच्या निळाईचे वर्णन करणारी कविता, कपडे आणि प्रतिष्ठेवरून मिळणारी वागणूक मांडणारी कथा, राष्ट्रध्वजातील अशोकचक्राची व्यथा मांडणारे एकपात्री सादरीकरण... मुलंडच्या वझे-केळकर महाविद्यालयातील युवा साहित्यशिल्पी आपले साहित्य सादर करत होते आणि प्रत्येक सादरीकरणानंतर महाविद्यालयाचे सभागृह टाळ्यांनी दणाणून जात होते. निमित्त होते महाराष्ट्र टाइम्स आयोजित ‘शोध युवा प्रतिभेचा’ या स्पर्धेचे!

रोहन प्रकाशनाच्या सहकार्याने आणि मराठी वाङ्मय मंडळाच्या सहकार्याने होणारी ही स्पर्धा मंगळवारी वझे-केळकर महाविद्यालयात पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निशांत रेडीज आणि मनस्वी लगाडे या दोन युवा शब्दशिल्पींची निवड झाली. स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी युवा कवी प्रा. आदित्य दवणे आणि प्रा. अमोल पवार यांनी पार पाडली. तर मराठी भाषा विभागप्रमुख अरविंद जाधव यांनी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.

स्पर्धेच्या सुरुवातीलाच अजिंक्य भुजबळ याने इमारतीतल्या क्रिकेट मॅचचा आधार घेत माणसे एकमेकांना फक्त ‘स्टेटस’ या निकषावर कशी वागवतात, याचे यथार्थ वर्णन करणारी कथा सादर केली. त्यानंतर ईशा मिश्रा या विद्यार्थिनीने अस्खलित मराठीत प्रेमकविता सादर करत सर्वांची वाहवा मिळवली. ‘शोध युवा प्रतिभेचा’ स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी कविता लिहिणाऱ्या आयुष खरातने प्रेमकविता सादर केली. अबोली जांभेकरने जिवलग मैत्री या विषयावरील कविता सादर केली. तर अंतिम फेरीत पोहोचलेल्या मनस्वी लगाडे हिने राष्ट्रध्वजावरील अशोकचक्राचे मनोगत एकपात्री प्रयोगाद्वारे प्रभावीपणे मांडले. निशांत रेडीजने वेश्येसोबत प्रेमात पडलेल्या तरुणाची व्यथा गझलेतून मांडली.

अधिकाधिक वाचन करून अनुभवकक्षा रुंदावण्याचा गुरुमंत्र विद्यार्थ्यांना देत, प्रा. आदित्य दवणे यांनी त्यांच्या ‘कविता’ याच कवितेचे प्रभावी सादरीकरण केले. तर प्रा. अमोल पवार यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.