दारूपार्टीने युवकाचा जीव घेतला. ही घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेडिकल चौकातील शान बीअर बारसमोर घडली. ऋतिक प्रकाश सातार (वय २५, रा. राहुलनगर, नवजीवन कॉलनी), असे मृताचे नाव आहे. तो चालक होता.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, ऋतिक याची पत्नी मेडिकलमध्ये दाखल असून तिने मुलाला जन्म दिला. रविवारी रात्री ऋतिकला डबा देण्यासाठी त्याच्या मोठ्या भावाचा मेहुणा राहुल साहेबराव कुऱ्हाडे (वय २६) व त्याचा मित्र नयन गेडाम (वय २५) हे एमएच ४० सीएम ३४८७ क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने मेडिकल चौकात आले. त्यांनी वाहनात दारू प्यायली. त्यानंतर राहुल याने ऋतिकला दारू आणायला पाठविले. वाहन सुरू होते. ऋतिक हा वाहनासमोर आला. याचवेळी राहुल याचा पाय गिअरला लागला. गाडी समोर गेली. यात चाकाखाली आल्याने ऋतिकचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नयन हा तेथून पळायला लागला. नागरिकांनी त्याला पकडले. राहुल यालाही ताब्यात घेत चोप देण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच अजनी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी दोघांची सुटका केली. पोलिसांनी राहुलविरुद्ध प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल केला. ऋतिकच्या मृत्यूने नवजात मुलाचे पितृछत्र हरपले. या घटनेने नातेवाइकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.









