‘राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी आधीच सुरू झाली आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माझ्याकडे पत्र देऊन याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली असून, मी तत्काळकेंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. याबाबत मी स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली असून, या प्रकरणाचे तथ्य समोर आले पाहिजे’, असे म्हणणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मांडले.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात चहापानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरील भूमिका जाहीर केली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते. कोणाच्या मनात काही शंका असतील तर त्यांनी त्या डीजीसीए किंवा आमच्याकडे द्याव्यात, त्यांचा निश्चित विचार करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. दरम्यान, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात लाचखोरीचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे सावट अधिवेशनावर असेल, पण त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. मुख्यमंत्री अर्थसंकल्प मांडणार आहेत. ते स्वत: अर्थतज्ज्ञ आहेत. राज्याची आर्थिक नाडी त्यांना माहिती आहे. त्यांनी मांडलेला अर्थसंकल्प राज्याला प्रगतीच्या शिखरावर नेणारा असेल. आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाले नाही’, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
‘उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्याची (पान ४वर)








