‘काँग्रेसकडून हीन राजकारण’

महाराष्ट्र टाइम्स

नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय एआय परिषदेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या अर्धनग्न आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत टीका केली. काँग्रेसने गलिच्छ राजकारण करत देशाचा अवमान केल्याचे ते म्हणाले. या घटनेमुळे देशभरातून काँग्रेसवर टीका होत आहे. काही विरोधी पक्षांनी काँग्रेसवर टीका करून सत्याच्या बाजूने उभे राहिल्याबद्दल मोदींनी त्यांचे आभार मानले.

‘काँग्रेसकडून हीन राजकारण’
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय एआय परिषदेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या अर्धनग्न आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. ‘भारत यजमान असलेल्या या परिषदेत काँग्रेसने आपल्या गलिच्छ व नग्न राजकारणाचे लांच्छनास्पद दर्शन घडवले’, असे म्हणत पंतप्रधानांनी काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीवर बोट ठेवले. विकास प्रकल्पांच्या लोकार्पणानंतर झालेल्या सभेत बोलताना त्यांनी हा घणाघाती हल्ला चढवला.

एआय (कृत्रिम प्रज्ञा) परिषदेदरम्यान युवक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत शर्ट काढून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारानंतर अनेकांना पोलिसांनी अटक केली आणि या कृतीवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पंतप्रधान मोदी यांनी यावर नाराजी व्यक्त करत म्हटले की, ‘काँग्रेसने आता सर्व सीमा ओलांडल्या असून, त्यांच्यावर देशभरातून टीका होत आहे. मात्र, यामुळे लज्जा वाटण्याऐवजी देशाचा अवमान करणाऱ्या कार्यकर्त्यांचे त्यांचे नेते उदात्तीकरण करत आहेत.’
पंतप्रधानांनी या घटनेबद्दल काही विरोधी पक्षांचे आभार मानले. ‘हे विरोधी पक्ष सत्याच्या व देशाभिमानाच्या बाजूने उभे राहिले’, असे ते म्हणाले. काँग्रेसच्या या वर्तनामुळे पक्ष वैचारिकदृष्ट्या किती दिवाळखोर झाला आहे, हे दिसून येते, असेही त्यांनी अधोरेखित केले. या आंदोलनामुळे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली असून, काँग्रेसने देशाची प्रतिमा मलिन केली आहे, अशी भावना व्यक्त होत आहे. देशाच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी एकत्र येण्याची गरज असताना, काँग्रेसने अशा प्रकारच्या आंदोलनांनी वातावरण बिघडवल्याची टीका होत आहे.