चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

महाराष्ट्र टाइम्स

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सरकार आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. मंत्र्यांच्या पीएला अटक, मेट्रो स्लॅब कोसळणे आणि अजित पवार यांच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी निषेध नोंदवला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन बहिष्कारची घोषणा केली. अधिवेशनात सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती आहे.

चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या बैठकीला आणि पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस शपचा एकही बडा नेता उपस्थित नव्हता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर सरकारला देण्यात आलेला पत्रावरही माजी आमदार माजी आमदार मिलिंद कांबळे यांची सही होती. मिलिंद कांबळेच या बैठकीला उपस्थित होते.

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आज, सोमवारपासून सुरुवात होणार असून, या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला.

‘मंत्रालयात थेट लक्ष्मीदर्शन सुरू असून, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या पीएला अटक करण्यात आली. मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला. राज्यातील महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा आणि जनविरोधी धोरणांचा निषेध करत आहोत,’ असे म्हणत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या अधिकृत चहापानावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकत असल्याची घोषणा रविवारी विरोधकांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, अजित पवार यांचा मृत्यू हा घातपात, की अपघात याबाबत राज्यात अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याकडे विरोधकांनी लक्ष वेधले.

सोमवारपासून मुंबईत सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घालत असल्याचे जाहीर केले. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, सतेज पाटील आदी नेते उपस्थित होते. तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची विशेष बैठक रविवारी पार पडली.

‘राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू हा घातपात की अपघात याबाबत राज्यात अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत सरकारची भूमिका संदिग्ध आहे. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर शाळांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आला. इतकी घाई कुणाला होती? जर ही प्रक्रिया योग्य होती तर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती का दिली,’ असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. ‘राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारचे धोरण नाही, शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही. राज्यात झालेल्या अतिवृष्टीसाठी केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवूनही अजूनही राज्याला निधी मिळालेला नाही,’ असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

‘विधानसभाध्यक्षांची दादागिरी’

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःला इन्फ्रामॅन म्हणून स्वतःचे मार्केटिंग करत आहेत; पण मुलुंडमध्ये मेट्रोमधील स्लॅब कोसळून एकाच मृत्यू झाला. एमएमआरडीने बांधलेला पूल हा आठवे आश्चर्य मानावे लागेल. शहरात लोकांनी जगायचे कसे? रस्त्यावर चालताना मृत्यू, विधानसभा अध्यक्षांची दादागिरी सुरू आहे. महायुतीचे बहुमताचे सरकार असूनही त्यांना विरोधी पक्षाची भीती का आहे,’ असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधिमंडळ नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

‘मंत्रालयात थेट लक्ष्मीदर्शन’

‘मंत्रालयात थेट ‘लक्ष्मीदर्शन’ सुरू असून, एसीबीने धाड टाकली. मंत्री झिरवाळ यांच्या पीएला अटक करण्यात आली आणि अजूनही मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आलेला नाही. उच्चपदस्थ मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीच्या अंमली पदार्थाच्या फॅक्टरीवर पोलिसांनी धाड टाकली; पण त्यांच्यावर कारवाई झालेली नाही,’ असे म्हणत चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले.