मंत्रमुग्ध करणारे स्वर अन् तालाचा संगम साधून लालित्यपूर्ण नृत्याविष्काराने पुणेकरांची मने जिंकली. निमित्त होते ‘मेलांज’ या कार्यक्रमाचे.
‘ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’तर्फे आयोजित ‘मेलांज’ या कार्यक्रमात प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना संध्या मुरलीधरन आणि ज्येष्ठ गायिका विदूषी अनुराधा कुबेर यांनी कलाप्रस्तुती केली. या वेळी फाउंडेशनचे संस्थापक संचालक प्रवीण कडले, चेतना कडले उपस्थित होते.
संध्या मुरलीधरन यांनी अरबी रागातील गणेश वंदनेची पुष्पांजली अर्पण करीत मैफलीची सुरुवात केली. त्यानंतर देवीस्तुतीतून देवीची विविध रूपे दाखवली. अत्यंत बोलके हावभाव, लयबद्ध देहबोली, तालबद्ध पदन्यासातून उलगडलेली कृष्णलीला पुणेकरांची दाद मिळवणारी ठरली. तिल्लाना सादर करून त्यांनी सादरीकरणाचा समारोप केला.
भेंडीबाजार घराण्याच्या ज्येष्ठ गायिका विदूषी अनुराधा कुबेर यांच्या सुरेल मैफलीने उत्तरार्ध सजला. गायकीचे बारकावे लीलया सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. ‘मै तो करी आयी पिया संग रंगरलीया’ ही पारंपरिक बंदिश सादर करून गायनाला सुरुवात केली. भेंडीबाजार घराण्याची खासियत असणाऱ्या पटबिहाग रागातील रचना सादर केल्या. भैरवीने त्यांनी मैफलीचा समारोप केला. त्यांना वेदांग क्षीरसागर (तबला), सौमित्र क्षीरसागर (हार्मोनियम), मृदगंधा आणि ओवी (तानपुरा) यांनी साथ केली.








