सरकारी अधिकाऱ्यांनी वाचन करावे

महाराष्ट्र टाइम्स

पुण्यात राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन पार पडले. विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अधिकाऱ्यांना वाचनाची जोड देऊन उत्तम साहित्य निर्मितीचा सल्ला दिला. अनिल कवडे यांनी चांगले आचारविचार समाजात रुजवण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. महेश भागवत यांनी संमेलनातील उपक्रमांचा आढावा घेतला. या संमेलनातून विचारांना स्फूर्ती मिळाली.

सरकारी अधिकाऱ्यांनी वाचन करावे
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्येही प्रतिभेची कमतरता नाही. त्यांच्याकडे अनुभवाचे संचित असून, याला सकस वाचनाची जोड देणे गरजेचे आहे. त्यातून अधिक दर्जेदार आणि उत्तम साहित्य निर्मिती होईल,’ असा सल्ला विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिला.

पुणे महापालिका, ‘यशदा’ आणि ‘संवाद’ यांच्यातर्फे आयोजित ‘राज्यस्तरीय दुसऱ्या शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलना’चा समारोप पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी या संमेलनाचे अध्यक्ष आणि तेलंगण राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक महेश भागवत, माजी सहकार आयुक्त अनिल कवडे, ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, गुजरातचे वस्तू आणि सेवा कर विभागाचे प्रधान आयुक्त सुरेंद्रकुमार मानकोसकर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, संमेलनाचे निमंत्रक सुनील महाजन, राजीव नंदकर उपस्थित होते.

‘प्रबोधनाचा मार्ग साहित्यनिर्मितीतून जातो, हे लक्षात घेता चांगले आचारविचार समाजात रुजविण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे,’ असे कवडे म्हणाले.

‘सरकारी अधिकाऱ्यांचे साहित्य संमेलन हे विचारांना स्फूर्ती देणारे आहे. विविध भाषा, संस्कृतीने नटलेल्या देशात अधिकाऱ्यांना काम करण्याची संधी मिळते. या अनुभवांवर अधिकाऱ्यांनी लेखन करावे,’ असे निंबाळकर नमूद केले. आम्ही लोकसेवेसाठी प्रेरित होऊन या क्षेत्रात आलो. मात्र, आताचे अधिकारी कोणती प्रेरणा घेऊन येतात, याचा आढावा घेतल्यास हे चित्र विदारक असल्याचे दिसते, याकडे लक्ष वेधून निबाळकर यांनी प्रशासकीय कामकाजातील अनुभव सांगितले.

भागवत यांनी संमेलनातील उपक्रमांचा आढावा घेतला. राजीव नंदकर यांनी सूत्रसंचालन केले. सुनील महाजन यांनी आभार मानले.