‘मराठीला ‘एआय’द्वारे बळ’

महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra will soon introduce AI-powered language labs in every school. This initiative aims to enhance Marathi speaking and reading skills among students. Chief Minister Devendra Fadnavis made this announcement at the World Marathi Convention. The technology will provide reports on individual student progress.

‘मराठीला ‘एआय’द्वारे बळ’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळ करणाऱ्या शाळांसह राज्यातील प्रत्येक शाळेत लवकरच कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानावर आधारित भाषा प्रयोगशाळा (लँग्वेज लॅब) सुरू केली जाईल. त्यातून मुलांमध्ये मराठी संभाषणकौशल्य विकसित केले जाईल’, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. ‘या निर्णयामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता, वाचता येण्याचा आग्रह पूर्ण होण्यास हातभार लागेल’, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मविप्र समाजाच्या प्रांगणातील मुख्य मंडपात हा सोहळा झाला. पुढील तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध साहित्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

‘मराठी भाषा प्रत्येकाने शिकायला हवी, असे आपल्याला वाटते. त्यामुळे गेल्या वेळी मुख्यमंत्री असताना मी प्रत्येक शाळेत मराठी विषय अध्यापनाची सक्ती केली होती. मात्र, वेगळे बोर्ड असल्याचे कारण देत अजूनही काही शाळांत मराठी शिकवली जात नाही. त्यामुळे आता ‘एआय’च्या मदतीने मराठीचा विकास साधण्याचा प्रयत्न शासन करीत असून, लवकरच प्रत्येक शाळेत भाषा प्रयोगशाळा सुरू केली जाईल. या उपकरणाचे सध्या प्रयोग सुरू आहेत. शाळांना एखादा विषय सक्तीचा केला, की प्रगतिपुस्तकावर श्रेणी देऊन निकाल लावला जातो. मात्र, आता या उपकरणाद्वारे प्रत्येकाचे संभाषणकौशल्य प्रत्यक्ष किती विकसित झाले, याचा अहवाल मिळणार आहे’, असे मुख्यमंत्री म्हणाले. ‘एआय’मुळे आव्हाने निर्माण झाली असली, तरी त्यातून पुढे आलेल्या संधींचा वापर करून मराठी साहित्य जागतिक पातळीवर नेले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव केला. मराठी भाषा अरबी, फारसी शब्दांनी प्रदूषित झाली असताना, छत्रपती शिवरायांनी पहिला मराठी प्रमाणभाषा कोश निर्माण केला, तर आधुनिक महाराष्ट्रात भाषाशुद्धीचे कार्य सावरकरांनी केल्याचे ते म्हणाले. भाषेचा अभिमान बाळगण्यासोबत ती ज्ञानभाषा आणि व्यवहारभाषा होणे गरजेचे आहे. त्यासाठी मराठी विभाग प्रयत्न करीत आहे, असेही त्यांनी सांगितले. फडणवीस यांनी विश्व संमेलनासाठी नाशिकमध्ये आलेल्या विदेशातील मराठी बांधवांना पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे निमंत्रणही दिले.

या कार्यक्रमात मराठी भाषा विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. भालचंद्र नेमाडे यांना साहित्यभूषण, श्रीनिवास कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवनगौरव, शांतिब्रह्म मारुती बाबा कुऱ्हेकर यांना विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्कार, प्रा. डॉ. दिलीप धोंडगे व इचलकरंजी येथील आपटे वाचनमंदिराला डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार, विनोद कुलकर्णी व कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद (कलबुर्गी) यांना कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषासंवर्धक पुरस्कार, तर नांदेडच्या निर्मल प्रकाशनाला श्री. पु. भागवत पुरस्काराने गौरवण्यात आले. त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तिनाथ महाराज संस्थानाला निवृत्तिनाथांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी ५० लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच, ‘आपलं मंत्रालय’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.