‘अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या टोळीचा सूत्रधार जेफ्री एपस्टीन तसेच, त्याची मैत्रीण घिसलैन मॅक्स्वेल यांनी केलेले गुन्हे व दुष्कृत्यांविषयी मला काहीही माहिती नाही. तसेच, त्याला भेटल्याचे स्मरतही नाही’, असे अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी म्हटले आहे. अमेरिकी संसदेच्या समितीने हिलरी व त्यांचे पती, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांना याप्रकरणी साक्ष नोंदवण्यासाठी बोलावले आहे. या अंतर्गत हिलरी यांची गुरुवारी बंद दाराआड तब्बल सहा तास साक्ष नोंदवण्यात आली. त्यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली.
एपस्टीन यांच्या गुन्ह्यांशी संबंधित अनेक फायली अलीकडेच उघड करण्यात आल्या होत्या. यातून विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक माजी अध्यक्ष, मंत्री, नेते यांची नावे समोर आली आहेत. यामध्ये हिलरी यांचाही उल्लेख होता. या पार्श्वभूमीवर अमेरिकी संसदेच्या समितीने क्लिंटन दाम्पत्याला चौकशीसाठी समन्स धाडले होते. यानुसार, संसदीय समितीने गुरुवारी हिलरी यांची साक्ष नोंदवली.






