मुंबई : अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी सातत्याने आवाज उठविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच, अपघातातील तांत्रिक बाबी, अजित पवार यांचे देवगिरी येथे स्मारक उभारणे आणि विमानात मृत्युमुखी पडलेल्या इतरांच्या कुटुंबीयांच्या मागण्यांचे पत्र पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. या दुर्घटनेची तांत्रिक तसेच फौजदारी अनुषंगाने तपास व्हावा यासाठी कालबद्ध चौकशीचे आदेश द्यावा आणि गुन्हा दाखल करावा, घटनेशी संबंधित सर्व बाबींचा तपास व्हावा, व्हीएसआर कंपनीची सेवा त्वरित स्थगित करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच देवगिरी बंगल्याचे रूपांतर स्मारकात करावे, विधिमंडळ आवारात अजितदादांचे स्मारक उभारावे. बारामती विमानतळ सुसज्ज करून त्याला अजितदादांचे नाव द्यावे. पुणे रिंग रोड, तळेगाव-चाकण-शिक्रापूर, पुणे-शिक्रापूर एलिव्हेटेड रस्ता यांना अजितदादांचे नाव द्यावे. तसेच, अजितदादांसोबत निधन झालेले विदीप जाधव, पिंकी माळी, शांभवी पाठक यांच्या कुटुंबीयांच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी पवार यांनी पत्राद्वारे केली.






