अपेक्षेनुसार, कार्यालयीन कामकाजाच्या सकाळच्या सत्रात अधिकाऱ्यांना संबंधित ठिकाणी भेटी व इतर कामे करणे अपेक्षित आहे. तर दुपारच्या सत्रात कार्यालयात हजर राहून तक्रार निवारण व नागरिकांशी संबंधित इतर कामांना प्राधान्य देणे गरजेचे असते. सार्वजनिक प्रशासन विभागाचे उपायुक्त श्याम कापसे यांच्यानुसार, हा निर्णय केवळ नागरिकांचा विचार करून घेण्यात आला आहे. आपल्या तक्रारी सोडवण्यासाठी महापालिकेत येणाऱ्या नागरिकांना आल्यापावली परतावे लागू नये, हा यामागचा विचार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असला तरी याची अंमलबजावणी कशाप्रकारे होते, यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.
दुपारनंतर कार्यालयातून अनेक अधिकारी, कर्मचारी गायब असतात. त्यामुळे नागरिकांना पायपीट करावी लागते, त्यांची गैरसोय होते. ही बाब लक्षात घेता, महापालिका प्रशासनाने चांगला उपाय शोधला आहे. त्याअंतर्गत सर्व विभागांतील अधिकाऱ्यांना दुपारी २ वाजतानंतर कार्यालयातच थांबण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
नागपूर महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने १० फेब्रुवारी रोजी यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे. विशेष म्हणजे, महापौर नीता ठाकरे आणि सत्तापक्ष नेते नरेंद्र ऊर्फ बाल्या बोरकर यांनी निर्देश दिल्यानंतर यासंबंधीचे आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत.
अनेक वर्षांपासून नागरिक महापालिका मुख्यालयात पाणीपुरवठा, तुंबलेल्या सांडपाणी वाहिन्यांसह नागरी सुविधेशी संबंधित तक्रारी घेऊन येतात. या तक्रारींसाठी ते संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडे जातात, त्यावेळी हे अधिकारी ‘फिल्ड’ वर असल्याचे पारंपरिक उत्तर देण्यात येते. त्यामुळे नागरिकांना आल्यापावली परतावे लागते. मात्र, या नव्या आदेशामुळे आता अधिकाऱ्यांना याप्रकारचे कुठलेही कारण देता येणार नाही. नागरिक त्यांच्या तक्रारी घेऊन आल्यावर त्या तक्रारींची दखल घेणे अधिकाऱ्यांना अनिवार्य राहील. नव्या परिपत्रकानुसार, अधिकाऱ्यांना त्यांच्या फिल्ड व्हिजीट, निरीक्षण व इतर कामे दुपारी २ वाजतापूर्वी पूर्ण करावी लागणार आहेत. त्यानंतर दुपारी २ वाजतापासून सायंकाळी उशिरापर्यंत अधिकाऱ्यांना मुख्यालयात किवा संबंधित झोनमधील कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. यासंबंधीचे निर्देश जारी करताना प्रशासकीय कामकाजाचे व्यवस्थित नियोजन करावे लागणार आहे. जेणेकरून, नागरिकांच्या तक्रारींसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याला वेळ देता येणार आहे.






