सातपूर : नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील सिबल हॉटेल सिग्नलवर अनेक दिवसांपासून पाणीगळती होत आहे. येथील खड्ड्यालगत पोलिसांचा बॅरिकेड ठेवण्यात आला होता. आता या खड्ड्याच्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. येथे साचणाऱ्या पाण्यामुळे, तसेच वाहने खड्ड्यात आदळत असल्याने स्थानिकांसह वाहनचालकांना गैरसोय सहन करावी लागत आहे. रस्ताकामाचे कारण सांगत येथील पाणी पावसाळी चेंबरमध्ये सोडण्यात आले आहे.
‘केटीएचएम’ अव्वल
नाशिक : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागामार्फत नुकत्याच पार पडलेल्या कनिष्ठ महाविद्यालय शालेय गुणवत्ता मूल्यांकन ात ९७.१० टक्के गुण मिळवत केटीएचएम कनिष्ठ महाविद्यालयाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. शालेय गुणवत्ता मूल्यांकन आणि हमी आराखडा समितीने (एसक्यूएएएफ) नुकतीच महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देत हे मूल्यांकन केले. शिक्षणाचा दर्जा, भौतिक सुविधा, खेळांच्या सुविधा, राज्य व केंद्र स्तरावर विद्यार्थ्यांचा सहभाग, उत्कृष्ट ग्रंथालय व वाचनालय सुविधा, भव्य इमारती आदी बाबींची पाहणी केल्यानंतर समितीने महाविद्यालयाला ४७० गुण दिले. समितीने या महाविद्यालयात उत्तम दर्जाचे शिक्षण मिळत असल्याची नोंद केल्याचेही महाविद्यालयामार्फत सांगण्यात आले.
‘निधी वितरित करा’
नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघासह राज्यातील विविध भागांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कायद्याअंतर्गत (मनरेगा) कामगारांची थकित मजुरी व घरकुल योजनेचा निधी मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे. हा निधी तत्काळ वितरित करावा, अशी मागणी खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडे केली आहे. निधी वितरणातील विलंबामुळे अनेक कामगारांना वेळेवर मजुरी मिळालेली नाही. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होत आहे. ग्रामपंचायतींची विकासकामेही रखडली आहेत. त्यामुळे याबाबत प्रभावी यंत्रणा उभारण्याची मागणीही खासदार भगरेंनी केली आहे.
‘नवज्योती’ची भेट
नाशिक : म्हसरूळ येथील नवज्योती महिला मंडळाच्या सदस्यांनी वात्सल्य वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी आजी-आजोबांसोबत हौशी खेळ खेळण्यात आले. त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारत हास्य, आनंद आणि आपुलकीचे क्षण अनुभवायला मिळाले. रंजना दालमिया, भावना कासलीवाल, वृंदा मेहता, सारिका मेहता, शिवानी ओझरकर, नयना सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
विद्यार्थिनीचा विनयभंग
नाशिकरोड : शालेय विद्यार्थिनीचा पाठलाग करून ‘रिलेशनशिप’ ठेवण्याबाबत आग्रह करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध विनयभंग व ‘पोक्सो’ कायद्याखाली उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहजाद खान असे संशयिताचे नाव आहे.






