Historic Championship Title Of Indian Youth Team With Vaibhav Suryavanshis Aggressive Play
भारतीय युवा संघाचे ‘वैभव’शाली विजेतेपद
महाराष्ट्र टाइम्स•
भारतीय युवा संघाने इंग्लंडला १९ वर्षांखालील वन-डे विश्वचषक अंतिम सामन्यात नमवले. वैभव सूर्यवंशीच्या १७५ धावांच्या शानदार खेळीमुळे भारताने ४११ धावा केल्या. इंग्लंडचा संघ ३११ धावांवर बाद झाला. या विजयामुळे भारताने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. वैभवच्या धडाकेबाज फलंदाजीने भारताला मोठा विजय मिळवून दिला.
भारताच्या युवा क्रिकेट संघाने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत १९ वर्षांखालील गटाच्या वन-डे वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले. वैभव सूर्यवंशीच्या १७५ धावांच्या वादळी खेळीमुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद ४११ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ ४०.२ षटकांत ३११ धावांत गुंडाळला गेला. या विजयासह भारतीय युवा संघाने सहाव्यांदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले.
वैभव सूर्यवंशीने आपल्या नावाप्रमाणेच 'वैभवशाली' खेळी केली. त्याने अवघ्या ८० चेंडूंमध्ये १५ चौकार आणि १५ षटकारांच्या मदतीने १७५ धावांची अशी काही आक्रमक फलंदाजी केली की प्रेक्षकांना चौकार आणि षटकारांचा पाऊस बघायला मिळाला. त्याच्या या धडाकेबाज खेळीमुळे भारताने पहिल्या २५ षटकांतच २५० धावांचा टप्पा ओलांडला होता. त्यावेळी भारत किती मोठ्या फरकाने जिंकेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. वैभव बाद झाल्यानंतर पुढील २५ षटकांत १६१ धावाच झाल्या, पण तोपर्यंत भारताचा विजय निश्चित झाला होता.भारताची सुरुवात थोडी संथ झाली. सलामीवीर ॲरॉन जॉर्ज ९ धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर वैभव आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांनी ९० चेंडूंमध्ये १४२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. आयुषने ५१ चेंडूंमध्ये ७ चौकार आणि २ षटकारांसह ५३ धावा केल्या. वैभवने त्यानंतर वेदान्त त्रिवेदीसोबत तिसऱ्या विकेटसाठी ३९ चेंडूंमध्ये ८९ धावांची भर घातली. वेदान्तने ३२ धावा केल्या. वैभवच्या या आक्रमक फलंदाजीचा प्रभाव इतर खेळाडूंवरही दिसून आला. विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (४० धावा), कनिष्क चौहान (नाबाद ३७ धावा) यांनीही चांगली साथ दिली. कनिष्कने २० चेंडूंमध्ये ३ चौकार आणि १ षटकारासह ३७ धावांची खेळी केली. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे भारताने लीलया ४०० धावांचा टप्पा पार केला.
वैभवची खेळी हीच दोन्ही संघांमधील निर्णायक फरक ठरली. त्याने अवघ्या ३२ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरची ५० धावाही त्याने केवळ २३ चेंडूंमध्ये फटकावल्या. विशेष म्हणजे, १०० ते १५० धावांचा टप्पा त्याने अवघ्या १६ चेंडूंमध्ये गाठला. शतकानंतर त्याने २५ चेंडूंमध्ये ७ चौकार आणि ७ षटकारांसह ७५ धावांची झटपट खेळी केली. त्याच्या फटकेबाजीचा कोणीही गोलंदाज बचाव करू शकला नाही. क्रिकेट चाहत्यांच्या आणि तज्ज्ञांच्या लक्षात राहणारी एक खास खेळी म्हणजे त्याने ग्रीनच्या उसळत्या चेंडूवर मारलेला फोरहँडचा षटकार.
वैभव बाद झाल्यानंतर इंग्लंडचे गोलंदाज थोडे जोशात आले आणि त्यांनी भारतीय धावगतीला खीळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत भारताने ४०० धावांचा टप्पा ओलांडला होता. इंग्लंडसमोर विजयासाठी षटकामागे आठपेक्षा जास्त धावांचे लक्ष्य होते. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच निर्धाव षटके टाकून इंग्लंडवर दबाव निर्माण केला. इंग्लंडचे अर्धशतक नवव्या षटकात आणि शतक १४ व्या षटकात झाले. त्यांची धावगती चांगली होती, पण एका क्षणी ३ बाद १७४ वरून त्यांची अवस्था ७ बाद १७७ अशी झाली.
यानंतर इंग्लंडच्या मधल्या फळीतील सेलेब फॉकनरने आक्रमक शतकी खेळी करून संघासाठी आशा निर्माण केल्या. त्याने ६७ चेंडूंमध्ये ९ चौकार आणि ७ षटकारांसह ११५ धावांची शानदार खेळी केली. मात्र, त्याला दुसऱ्या बाजूने फारशी साथ मिळाली नाही. भारतीय गोलंदाजांनी ठरावीक अंतराने विकेट्स घेत इंग्लंडवरील दडपण कायम ठेवले. आर. एस. अंबरीशने ९ षटकांत ५६ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या. दीपेश देवेंद्रनने ६ षटकांत ६४ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या. कनिष्क चौहानने ८.२ षटकांत ६३ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या, तर कर्णधार आयुष म्हात्रेने ५ षटकांत ३१ धावा देऊन १ विकेट घेतली. या गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे दोन वर्षांपूर्वी हुकलेले विजेतेपद भारताने या वेळी जिंकले.
इंग्लंडकडून बेन डॉकिन्सने ५६ चेंडूंमध्ये ७ चौकार आणि २ षटकारांसह ६६ धावा केल्या. बेन मायेसने २८ चेंडूंमध्ये ७ चौकार आणि २ षटकारांसह ४५ धावांची खेळी केली. थॉमस रेवने १८ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि १ षटकारासह ३१ धावा केल्या. जेम्स मिंटो २८ धावांवर बाद झाला. इंग्लंडचा संपूर्ण संघ ४०.२ षटकांत ३११ धावांवर बाद झाला.
संक्षिप्त धावफलक: भारत: ५० षटकांत ९ बाद ४११ ( वैभव सूर्यवंशी १७५, आयुष म्हात्रे ५३, वेदान्त त्रिवेदी ३२, अभिज्ञान कुंडू ४०, कनिष्क चौहान नाबाद ३७). इंग्लंड: ४०.२ षटकांत सर्व बाद ३११ (सेलेब फॉकनर ११५, बेन डॉकिन्स ६६, बेन मायेस ४५, थॉमस रेव ३१, जेम्स मिंटो २८).