भारताची मोहीम आजपासून

Contributed byअमेरिकेचा गोलंदाज|महाराष्ट्र टाइम्स

भारतीय संघ आज अमेरिकेविरुद्ध टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अनुपस्थितीतही भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन डावाची सुरुवात करतील. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात भारतीय संघाने चांगली तयारी केली आहे. अमेरिकेच्या संघात काही भारतीय वंशाचे खेळाडू आहेत, ज्यांचा अनुभव महत्त्वाचा ठरू शकतो. भारत विजयाचे ध्येय ठेवून मैदानात उतरेल.

भारताची मोहीम आजपासून
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

अपेक्षांचे ओझे झुगारून, जबरदस्त फॉर्मात असलेला भारतीय संघ आज, शनिवारी अमेरिकेविरुद्ध आपल्या टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात करील. टी-२० वर्ल्ड कपचे जेतेपद राखणारा पहिला संघ ठरण्याचे भारताचे ध्येय आहे.

२०२४च्या टी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघातील रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतरही जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाने आपली ताकद वाढवली आहे. २०२५ मधील खराब फॉर्मनंतर कर्णधार सूर्यकुमार यादवला गवसलेला सूर आणि यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून ईशान किशन चे जबरदस्त पुनरागमन, यामुळे भारतीय संघाची सर्व समीकरणे जुळून आली आहेत. ईशान किशन आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा अभिषेक शर्मा ही जोडी डावाची सुरुवात करील. त्यामुळे संजू सॅमसनला बाहेर बसावे लागेल.

फलंदाजीमध्ये सूर्यकुमारचा फॉर्म, तिलक वर्माचे सातत्य आणि हार्दिक पंड्या, उपकर्णधार अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांसारख्या अष्टपैलू खेळाडूंची फळी यामुळे भारतीय फलंदाजी रोखणे कठीण झाले आहे. याशिवाय रिंकूसिंहसारखा उत्तम ‘फिनिशर’देखील संघात आहे. गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराहच्या साथीला अर्शदीपसिंग आहे. फिरकीमध्ये कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती हे जगातील सर्वोत्तम फिरकीपटू भारताकडे आहेत. मात्र, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने म्हटल्याप्रमाणे दव भारतासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो.

दुसरीकडे, अमेरिकेच्या संघात काही जुने ओळखीचे चेहरे दिसणार आहेत. वानखेडे स्टेडियमवर सूर्यकुमारसोबत मुंबईसाठी खेळलेले शुभम रांजणे, हरमीतसिंग आणि सौरभ नेत्रावळकर आता अमेरिकेकडून खेळत आहेत. खेळपट्टी आणि परिस्थितीचा त्यांचा अनुभव अमेरिकेसाठी फायदेशीर ठरू शकतो. अमेरिकेने दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानला हरवून सर्वांचे लक्ष वेधले होते, त्यामुळे भारत त्यांना हलक्यात घेणार नाही.

भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंह, अक्षर पटेल (उपकर्णधार), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अर्शदीपसिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

अमेरिका संघ : मोनांक पटेल (कर्णधार), अँड्रिस गॉस (यष्टीरक्षक), साईतेजा मुक्कम्मल्ला, शयन जहांगीर, हरमीतसिंग, शेहान जयसूर्या, संजय कृष्णमूर्ती, मिलिंद कुमार, महंमद मोहसिन, शुभम रांजणे, शॅडली वॅन शॉकविक, अली खान, जसदीप सिंग, नॉस्थुश केंजीगे, सौरभ नेत्रावळकर.