‘संयम’ आणि हट्टाच्या कात्रीतलं प्रेम!

Contributed byकल्पेशराज कुबलKalpeshraj.Kubal@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

रुबाब सिनेमात लेखक-दिग्दर्शक शेखर रणखांबे यांनी संयमानं सांगितलेली प्रेमकहाणी आहे. सूरज आणि वैशाली यांच्या प्रेमाची ही गोष्ट आहे. काही ठिकाणी सिनेमा संथ वाटतो पण क्लायमॅक्समुळे प्रेक्षकांची पकड घट्ट होते. सूरज आणि वैशालीची पात्रं संभाजी ससाणे आणि शीतल पाटील यांनी उत्तम साकारली आहेत. गाणी आणि तांत्रिक बाजूही चांगली आहे. ही प्रेमकथा शेवटी मनावर ठसा उमटवते.

‘संयम’ आणि हट्टाच्या कात्रीतलं प्रेम!

सगळं ऐकायला थोडंसं काव्यात्मक, थोडंसं आदर्शवादी वाटेल; पण अभिनेता इरफान खानचा ‘जज्बा’ सिनेमातील तो सुंदर संवाद आठवा, ‘महोब्बत है इसलिए जाने दिया... जिद होती तो बाहों में होती...’ या एका ओळीत प्रेमाचं आणि अहंकाराचं, मोकळेपणाचं आणि मालकीभावाचं द्वंद्व दडलेलं आहे. ‘खरंखुरं’ प्रेम करणाऱ्या प्रेमी युगुलांचंही असंच काहीसं असतं. आपल्या प्रेमासाठी जीव देणारे आणि प्रसंगी जीव घेणारे. असे ‘ग्लोरिफाय’ केलेले कित्येक नायक-नायिका आपण पाहिले. प्रत्यक्ष आयुष्यात घडलेल्या अशा घटनाही आपल्या कानावर पडल्या असतील. मात्र, दोन व्यक्ती प्रेमात आकंठ बुडालेल्या असतात, तेव्हा त्यांच्याभोवती विविध कारणांनी उसळणाऱ्या वादळाचं उत्तर केवळ ‘रक्तपात’च असू शकतं का? मग तो स्वतःचं आयुष्य संपवणारा असो, दुसऱ्याचा जीव घेणारा असो किंवा तिसऱ्यानंच त्या दोघांचा शिरच्छेद करणं असो. या सर्व टोकाच्या ‘उत्तरांना’ बगल देत, आपल्या मातीतून उमललेली, साधी-सरळ, ओळखीची वाटणारी; पण तरीही नवी भासणारी प्रेमकहाणी लेखक-दिग्दर्शक शेखर रणखांबे यांनी ‘रुबाब’मधून सांगितली आहे. ही कथा अट्टहासानं नाही, तर माणुसकीनं, समजुतीनं लिहिलेली आहे. पटकथेत पदोपदी हा ‘संयम’ अधोरेखित होतो.

‘रेखा’ या लघुपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या दिग्दर्शक रणखांबे यांनी पूर्ण लांबीचा पहिलाच सिनेमा करताना स्वतः पायवाट तुडवलेल्या गावातील गोष्ट निवडली आहे. यात रुबाबदार नायक-नायिका आहेत आणि खेड्या-शहरातील कानाकोपऱ्यात असलेल्या अनेक प्रेमी युगुलांच्या प्रेमासारखीच त्यांचीही कहाणी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एका गावात घडणारी ही गोष्ट दिग्दर्शकानं सांगीतिक पद्धतीनं उभी केली आहे. नाच-गाणी, नाट्य, प्रेम-विरह, मारधाड, सूड, बडेजावपणा आणि ‘स्लोमोशन’ असं सर्व काही यात आहे.


‘संयम’ आणि हट्टाच्या कात्रीतलं प्रेम!

लेखकानं पटकथा आणि प्रसंगांची साखळी बरीच लांबवर ताणली आहे. पडदा उजळताक्षणीच सिनेमाचा नायक सुरज्या म्हणजेच सूरज (संभाजी ससाणे) याच्या घराच्या भिंतीवर मोठ्या अक्षरात ‘शुभविवाह’ आणि ‘वर’ म्हणून सूरजचं नाव लिहिलेलं दिसतं. ‘वधू’चं नाव मात्र झाकलं गेलंय. सूरज आपल्या नववधूला बाइकवर बसवून रुबाबात घराबाहेर पडतो, तरीही प्रेक्षकांना तिचा चेहरा दिसत नाही. गावच्या रस्त्यावरून दुचाकी चालवताना सुरज इकडे-तिकडे पाहतो आणि त्याच्या मनात प्रेमकहाणीच्या आठवणी तरंगू लागतात. इथून सिनेमा थेट भूतकाळात शिरतो.

तीन मित्र सूरज, मनोज आणि रवी. गावातली तीन उनाड पोरं. दारू, गुटखा, सिगरेट यात रमलेली. वाळू तस्कर सूरज हा त्यांचा म्होरक्या. जन्मोजन्मी एकत्र राहण्याच्या शपथा वगैरे घेतल्यांनंतरही सूरजची प्रेयसी माधुरीचं लग्न दुसऱ्याच मुलाबरोबर होतं. ‘ब्रेकअप’ झालेला सुरज्या बाइकच्या नंबर प्लेटवर ‘तुटलेल्या बदामाचा’ स्टिकर लावून फिरतो. गावातली तरुण पोरांच्या गाडीवर फिल्मी डायलॉग्ज असलेले भन्नाट स्टिकर आहेत, जे ‘आली लहर केला कहर...’ प्रमाणे बदलत असतात. सूरजला ब्रेकअपमधून बाहेर काढण्यासाठी त्याचे मित्र त्याला दुसऱ्या नात्यात ढकलतात. वैशालीच्या (शीतल पाटील) रूपात सूरजसमोर प्रेमाची नवी संधी चालून येते. दोघं प्रेमात पडतात. फुल्ल ‘फिल्मी मॅटर’ सुरू होतं. सोबतीला गाणी असतातच; पण सगळं सुरळीत चाललेलं असतानाच शंकेची पाल चुकचुकते. वैशालीही माधुरीप्रमाणेच दगा देणार का?

लग्न करून निघून गेलेली माधुरी दरम्यानच्या काळात घटस्फोट घेऊन परत आलेली असते. सूरजसमोर दोन पर्याय उभे राहतात; पहिलं प्रेम की दुसरं; की ‘खरंखुरं’ प्रेम? तो कुठला पर्याय निवडतो, या प्रश्नाचं मनोरंजक उत्तर सिनेमात आहेच; पण त्याहीपलीकडे उत्तरार्धात बरंच काही दडलं आहे. जे पाहणं, समजून घेणं आणि स्वीकारणं तितकंच गरजेचं आहे.

लेखक-दिग्दर्शक रणखांबे यांनी आपली गोष्ट प्रामाणिकपणे, ‘सूचक’तेनं पडद्यावर रेखाटली आहे. पटकथेचा वेग मात्र त्यांना कायम ठेवता आलेला नाही. कधी ती रटाळ, संथ होते; तर कधी पुनरावृत्ती करत राहते. ‘आता पुढं चला’ असं म्हणावंसं वाटतं. संकलकानं अधिक परिणामकारकतेनं कात्री चालवणं आवश्यक होतं. वातावरणनिर्मितीसाठी उभा केलेला गावचा प्रपंच अनावश्यक पसरला आहे. तो सरधोपटही आहे. पण, प्रीक्लायमॅक्स आणि क्लायमॅक्समुळे सिनेमा प्रेक्षकांवरील पकड घट्ट करतो आणि ‘प्रेमकहाणी’ला एक वेगळाच ‘टच’ देतो.

संभाजी ससाणे आणि शीतल पाटील; हे एरवी सिनेमात बॅकग्राउंडमध्ये असलेले दोन चेहरे सिनेमाभर ताकदीनं झळकले आहेत. त्यांच्या अभिनयात आश्वासकता आणि प्रामाणिकपणा दिसतो. सूरज आणि वैशाली ही पात्रं त्यांनी सहजतेनं निभावली आहेत. त्यांची संवादांची शैली, देहबोली, आविर्भाव आणि अभिनिवेश यातून ते गोष्टीला स्वतःच्या खांद्यावर वाहून नेतात. सर्व सहकलाकारांनीही त्यांना उत्तम साथ दिली आहे. त्यात दिग्दर्शकाचं श्रेयही मोलाचं आहे.

गीतकार मंगेश कांगणे, विनायक पवार, समीर पाटील यांनी लिहिलेली गाणी सुयोग्य आणि कथेला उठाव देणारी आहेत. चिनार-महेश यांनी त्यावर सुरेख स्वरसाज चढवला आहे. सिनेमाच्या इतर तांत्रिकबाजूसुद्धा चांगल्या आहेत. प्रामाणिकपणे सांगितलेली ही गोष्ट प्रेमकथा ंच्या गर्दीत वेगळी ओळख नक्कीच निर्माण करते. ‘रुबाब’ ही संयमानं उमलणारी प्रेमकथा आहे, जी काही ठिकाणी लांबते, अडखळते; पण शेवटी मनावर ठसा उमटवते. आणि हो, सूरजच्या मागे बाइकवर बसलेली वधू कोण आहे? याचं समाधानकारक उत्तरही तुम्हाला शेवटी मिळतं.