Motorcyclist Dies In A Pit In Delhi Engineers Of The Water Board Suspended
दिल्लीत सरकारी यंत्रणेमुळे खड्डेमृत्यू
महाराष्ट्र टाइम्स•
जनकपुरीत दिल्ली जल बोर्डाने खोदलेल्या १५ फूट खोल खड्ड्यात पडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कमल भयानी असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी दिल्ली सरकारने जल बोर्डाच्या तीन इंजिनिअर्सना निलंबित केले आहे. पोलिसांनी जल बोर्डाचा कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
पश्चिम दिल्लीतील जनकपुरी भागात दिल्ली जल बोर्डाने खोदलेल्या १५ फूट खोल खड्ड्यात पडून एका २५ वर्षीय मोटरसायकलस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. कमल भयानी असे मृताचे नाव असून तो एका खासगी बँकेत कॉल सेंटरमध्ये काम करत होता. या घटनेनंतर दिल्ली सरकारने जल बोर्डाच्या तीन इंजिनीअरना निलंबित केले असून, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दिल्ली जल बोर्डाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.
सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास एका महिलेने पोलिसांना फोन करून १५ फूट खोल खड्ड्यात एक व्यक्ती पडल्याची आणि ती हालचाल करत नसल्याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, दिल्ली जल बोर्डाने खोदलेल्या या खड्ड्यात कमल भयानीचा मृत्यू झाल्याचे समोर आले. कमल हा रोज या रस्त्याने प्रवास करत असावा आणि त्याला या खड्ड्याबद्दल माहिती नसावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा रस्ता गेल्या काही दिवसांपासून बंद होता आणि गुरुवारी हा खड्डा खोदण्यात आला होता.या घटनेच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली सरकारने जल बोर्डाच्या तीन इंजिनीअरना निलंबित केले आहे. दिल्ली पोलिसांनी जल बोर्डाचा कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली जल बोर्डाने या घटनेची पारदर्शक चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीला घटनास्थळाची पाहणी करून सुरक्षा व्यवस्था, बॅरिकेड्स, सूचना फलक आणि वाहतूक व्यवस्थापनाचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.