‘वर्ल्ड कप फिर से शुरू हो गया क्या... कितना भीड है’... डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमच्या परिसरातील वाहतूक कोंडीत अडकलेल्या बसमधील वरिष्ठ नागरिकांना पडलेला हा प्रश्न... ही गर्दी खरेतर महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) टी-२० क्रिकेटमधील मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स या सलामीच्या सामन्यासाठी झाली होती.
नेरूळ, नवी मुंबईतील या मैदानावर यापूर्वीही डब्ल्यूपीएलच्या लढती झाल्या आहेत, ज्यांना ‘हाऊसफुल’ प्रतिसादही लाभला आहे. यंदा किमान सलामीच्या लढतीस असलेल्या गर्दीत हौशे-नौशे नक्कीच जास्त होते. काही महिन्यांपूर्वीच याच स्टेडियमवर भारताने महिला वनडे क्रिकेटचे जगज्जेतेपद पटकावले होते. डब्ल्यूपीएलच्या निमित्ताने येथे महिला क्रिकेटचा थरार परतला.
एरवी स्टेडियम परिसरातील मुंबई महामार्गाला जोडून असलेल्या ‘सर्व्हिस रोड’वर जर्सी, कॅप विकणारे तुरळक विक्रेते दिसतात. चेहऱ्यावर संघ, चौकार, षटकाराचे आकडे रंगवणारे कलाकार उपस्थित असतात. मात्र यावेळी या विक्रेत्यांची गर्दीही मोठीच होती. सलामीच्या सामन्याआधी मनोरंजनाचा कार्यक्रमही होता. त्यामुळेही गर्दी वाढलेली होती. ही गर्दी आणि वाहतूक कोंडी एवढी होती की, स्पर्धेच्या प्रायोजकांपैकी एक असणाऱ्या मोटर कंपनीची कोंडी झाली. संबंधित मोटर आणि त्यात असलेला निवेदक वेळेत स्टेडियममध्ये येणे अपेक्षित होते. मात्र नवी कोरी पिवळ्या रंगाची ही मोटर वाहतूक कोंडीमुळे अडकून पडली. संबंधित कागदपत्रे, प्रवेशिकेची पूर्तता झाल्यानंतर ही मोटर मार्गस्थ झाली.
विराट, रोहितचाही बोलबोला!
विराट कोहली, रोहित शर्मा हे आधुनिक क्रिकेटचे हिरो आहेत. सध्या वनडे या क्रिकेटच्या एकाच प्रकारांत ते दोघे भाग घेतात; पण त्यांची लोकप्रियता कायम आहे. महिला लीगच्या लढतीसाठी आलेल्या चाहत्यांचा रोहित, विराट यांच्या नावांची जर्सी विकत घेण्याकडे कल होता. या विक्रेत्यांनीही ‘डिस्प्ले’ला रोहित, विराट यांच्याच जर्सी लावून ठेवल्या होत्या.
स्मृती, हरमनची जादू
घरच्या मैदानावर, पाठिराख्यांच्या साक्षीने पटकावलेल्या वर्ल्ड कप महिला जेतेपदाचे क्षण संस्मरणीयच. त्याआधीपासूनच हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्या चाहत्यांची संख्या मोठी होती. जगज्जेतेपदानंतर यात भरच पडली. या सगळ्या पार्श्वभूमीवर शुक्रवारची लढत स्मृती आणि हरमन यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच ठरली. या तारांकित क्रिकेटपटू आमने-सामने येणार असल्याने सहाजिकच सामन्यात प्रेक्षकांनी गर्दी केली होती.
स्मृतीच्या बसला गराडा
स्मृती मानधनाने आपल्या दमदार फलंदाजीने जगभरातील चाहते आणि तज्ज्ञांची वाहवा मिळवली आहे. शुक्रवारी तिच्या रॉयल चॅलेंजर्स संघाची बस स्टेडियम परिसरात आल्यावर चाहत्यांनी जल्लोष केला. स्मृती, स्मृती अशा घोषणाही झाल्या.
मनोरंजनाने सलामी
स्पर्धा आणि सामन्याची सुरुवात मनोरंजनाच्या कार्यक्रमाने झाली. मॉडेल-अभिनेत्री हरनाझ संधू हिने भारतीय महिलांना मानवंदना दिली. तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने नृत्य सादर केले. गायक योयो हनीसिंग याने डगआऊटमध्ये बसलेल्या स्मृती आणि हरमन यांच्यामधून एन्ट्री घेत कला सादर केली. फटाक्यांची आतषबाजी, रोषणाई असा झगमगता कार्यक्रम सामन्याआधी पार पडला.


