वाइल्ड कार्ड खेळाडूंची ३७ मिनिटांतच हार

महाराष्ट्र टाइम्स

केनियातील नैरोबी येथे एका टेनिस स्पर्धेत इजिप्तच्या हजर अब्देलकादेरचा दारुण पराभव झाला. तिला अवघ्या ३७ मिनिटांतच पराभवाला सामोरे जावे लागले. जर्मनीच्या लॉरेना शाएदलने तिला ०-६, ०-६ असे हरवले. हजरला संपूर्ण सामन्यात केवळ तीन गुण मिळाले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आयोजकांनी स्पष्टीकरण दिले.

egyptian tennis player hazar abdelkaders shocking defeat in just 37 minutes
' टेनिस केनिया 'ने इजिप्तच्या हजर अब्देलकादेर हिला वाइल्ड कार्ड (थेट प्रवेश) देऊन मोठी चूक केली, अशी कबुली दिली आहे. नैरोबी येथे सुरू असलेल्या आयटीएफ डब्ल्यू ३५ टेनिस स्पर्धेत हजरचा जर्मनीच्या लॉरेना शाएदल हिने ०-६, ०-६ असा दारुण पराभव केला. हजरने संपूर्ण सामन्यात केवळ तीन गुण मिळवले, तेही प्रतिस्पर्ध्याच्या चुकांमुळे. हा सामना आणि हजरचा खेळ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर 'टेनिस केनिया'ला स्पष्टीकरण द्यावे लागले.

केनियातील नैरोबी येथे आयटीएफ डब्ल्यू ३५ टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत इजिप्तची टेनिसपटू हजर अब्देलकादेर हिला 'टेनिस केनिया'ने वाइल्ड कार्ड दिले होते. मात्र, हजरची कामगिरी व्यावसायिक टेनिसपटूला शोभणारी नव्हती. जर्मनीच्या लॉरेना शाएदलने हजरचा ०-६, ०-६ असा एकतर्फी पराभव केला. विशेष म्हणजे, हजरला संपूर्ण सामन्यात फक्त तीन गुण मिळवता आले. यातील दोन गुण लॉरेना शाएदलने केलेल्या डबल फॉल्टमुळे (सर्व्हिस करताना दोनदा चूक होणे) मिळाले, तर एक गुण लॉरेनाने केलेल्या अनफोर्स्ड एररमुळे (टाळता येण्याजोगी चूक) मिळाला.
हजरने अवघ्या ३७ मिनिटांत सामना गमावला. तिच्याकडून संपूर्ण सामन्यात वीस वेळा डबल फॉल्ट झाले. हजरच्या या सुमार खेळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे टेनिसप्रेमी आणि तज्ज्ञांनी आयोजकांवर टीका केली. व्यावसायिक टेनिससाठी आवश्यक असलेले कौशल्य नसलेल्या खेळाडूला थेट प्रवेश कसा दिला, असा प्रश्न विचारला जात आहे.

'टेनिस केनिया'ने यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, "वाइल्ड कार्डसाठी (थेट प्रवेश) इजिप्तच्या हजर अब्देलकादेर हिचाच अर्ज आला होता." तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये ०-६, ०-६ असे पराभव नवीन नाहीत, पण प्रतिस्पर्ध्याच्या चुकांमुळेच गुण मिळवणे हे व्यावसायिक टेनिसपटूसाठी लाजिरवाणे आहे.