गरजवंतांपर्यंत पोहोचावी नेत्ररुग्णसेवा

महाराष्ट्र टाइम्स

माधव नेत्रालयातर्फे डोळ्यांच्या उपचारासोबतच संशोधनालाही प्राधान्य दिले जात आहे. गरजवंतांपर्यंत नेत्रसेवा पोहोचवण्यासाठी 'आय केअर फॉर डोअर' ही संकल्पना राबवण्याची गरज आहे. केरळच्या वायनाड येथील पद्मश्री डॉ. धनंजय सगदेव यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी 'नेत्रांजली' या त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील माध्यम प्रतिनिधींचा सत्कारही करण्यात आला.

गरजवंतांपर्यंत पोहोचावी नेत्ररुग्णसेवा
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘माधव नेत्रालयातर्फे डोळ्यांच्या विविध आजारावर उपचारासोबतच संशोधनालाही प्राधान्य देण्यात येत आहे. नेत्रविकारांबाबत जनजागृती वाढविण्यासोबतच रुग्णांची सेवा ही केवळ रुग्णालयांपुरती मर्यादित न राहता गरजवंतांच्या घरापर्यंत पोहोचली पाहिजे. त्यासाठी ग्रामीण व आदिवासी भागातील गरजवंत रुग्णांपर्यंत सेवा पोहोचविण्यासाठी ‘आय केअर फॉर डोअर’ ही संकल्पना राबवावी’, असे मत केरळच्या वायनाड येथील स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचे मुख्य पद्मश्री डॉ. धनंजय सगदेव यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

वासुदेवनगर येथील माधव नेत्रालय व अनुसंधान केंद्राच्या संकल्प सिद्धी परिसरात ‘नेत्रांजली’ या त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सगदेव बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रवींद्र भुसारी, माधव नेत्रालयाचे प्रबंध संचालक मेजर जनरल डॉ. अनिल बाम, अनिल शर्मा, वंदना वर्णेकर, संदीप धर्माधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. सगदेव यांच्या हस्ते शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील माध्यम प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सुमेध वाघमारे, महेश बोकडे, अनिकेत शास्त्री, रोहित खोडे, सर्फराज अहमद, संजय गांजरे, गजानन उमाटे, रजत वशिष्ट, अनिकेत उमप, किरण राजदेरकर, चंद्रकांत चवरे, अमर काणे यांना स्मृतिचिन्ह आणि पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल शर्मा यांनी केले. संचालन श्रद्धा बडकस यांनी केले. वंदना वर्णेकर यांनी आभार मानले.