उमरखेड तालुक्यातील भवानी ग्रामपंचायतीमध्ये सहा हजारांवर बनावट जन्मनोंदी उघड झाल्या आहेत. आर्णी तालुक्यातील शेंदूरसनी ग्रामपंचायतीमधील बनावट जन्मनोंदींची एसआयटीकडून चौकशी सुरू असतानाच हा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उमरखेड तालुक्यातील भवानी रामपूर तांडा येथे बनावट जन्म नोंदी असल्याचे वक्तव्य केले होते. सोशल मीडियावर हे व्हायरल झाल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांनी चौकशी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना भवानी रामपूर तांडा येथे पाठविले. चौकशीत ४०० लोकसंख्येच्या गावात काही महिन्यांत ६ हजार २७७ जन्मनोंदी व दोन मृत्यूच्या बनावट नोंदी झाल्याचे दिसून आले. उमरखेडचे गटविकास अधिकारी किरण कोळपे यांनी जिल्हास्तरीय समितीला अहवाल पाठविला आहे. यापूर्वी शेंदूरसनी येथे २७ हजार ३९७ बनावट जन्मनोंदी आढळल्यावर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने यांची नेमणूक केली आहे. त्यांच्या पथकाने या प्रकरणी धागेदोरे जुळवत थेट बिहारमधून आदर्शकुमार दुबे याला अटक केली आहे. दुबे याची पोलिस कोठडी १२ जानेवारीपर्यंत आहे.
शेंदूरसनी प्रकरणानंतर राज्य शासनाने सायबर सेलचे अतिरिक्त पोलिस महासंचालक यशस्वी यादव यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापन केली आहे. यामध्ये आरोग्य विभागाच्या उपसंचालक बबिता कमलापूरकर व यवतमाळचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांचा समावेश आहे. पुढच्या आठवड्यात एसआयटीचे प्रमुख यवतमाळला येणार आहेत.






