जिल्हा परिषदेच्या शेष फंडातील १७ सामूहिक विकास कार्यक्रमांतर्गत मौदा, कामठी, भिवापूर व सावनेर तालुक्यातील गावांना व्यायामशाळा उपकरणे व बाह्य व्यायाम शाळा उपकरणे लावण्याचा निर्णय झाला होता. या साहित्याची खरेदी ‘जेम’वरून झाली असून प्रथमच बाह्य दरसूचीने ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
याबाबत बांधकाम विभागाने १३ नोव्हेंबर २०२५ च्या स्थायी समितीत या विषयाला मंजुरी देण्यासंदर्भात प्रस्ताव ठेवला होता. शेष फंडातील १७ सामूहिक विकास कार्यक्रमांतर्गत ही उपकरणे लावण्यात येणार आहेत. यासाठी काम मंजूर होते. पण, साहित्याचे दर २०२२-२३च्या महाराष्ट्र राज्य दरसूचीमध्ये समाविष्ट नव्हते. या कामासाठी लागणाऱ्या साहित्याचे दरपत्रक आयुक्त क्रीडा आणि युवा येवा संचालनालयाकडून मागविण्यात आले. त्यातील सर्वांत कमी दराला मंजुरी देण्यात आली. हा प्रस्तावसर्वानुमते मंजुर झाला आहे. या साहित्याची खरेदी बांधकाम विभागाने जेम प्रणालीवरून केली आहे. जवळपास ९० लाखांची ही साहित्य खरेदी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या व्यायामशाळेतील साहित्याबाबत कुठले ‘स्पेसिफिकेशन’ स्पष्ट होऊ शकले नाही. चार तालुक्यांना का प्राधान्य देण्यात आले, यावरून तर्क-वितर्क आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रीन जिमच्या साहित्यावरून मोठा गदारोळ झाला होता. कंत्राटदाराची देयके थांबविण्यात आली होती. प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते. या खरेदीविषयी विभागाकडून गुप्तता पाळल्या जात असल्याने आता या व्यायामशाळेतील साहित्य नेमके कुठे लागणार आहे, यावरून संशयाचे वातावरण आहे.






