याच कार्यक्रमात फिजिओथेरपीचे आणि आहाराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. रुग्णासोबत तुम्ही त्याला काहीच झाले नाही, असे वागा. त्याला आजाराविषयी न बोलता, गाणी ऐकवणे, जोक्स ऐकवणे, हसणे आणि हसवणे अशा विविध क्रिया करा, असेही तज्ज्ञांच्या वतीने आवाहन करण्यात आले.
आपल्या रुग्णांसाठी स्वत:ला झोकून देणाऱ्या आणि रुग्णांची दिवस-रात्र नि:स्वार्थ सेवा करणाऱ्या भाऊ, बहीण, इतर आप्तेष्ट तसेच वयस्कर आई-वडिलांना केअर सिग्मा हॉस्पिटलमध्ये एका विशेष कार्यक्रमात गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आस्था फाऊंडेशनचे डॉ. नरेंद्र वैद्य, केअर सिग्मा हॉस्पिटलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. उन्मेष टाकळकर, संचालक डॉ. मनिषा टाकळकर, 'ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर्स'चे संदीप कुलकर्णी, मेंदुविकारतज्ज्ञ डॉ. आनंद सोनी, डॉ. विशाल गायकवाड, समीर पवार आदी उपस्थित होते.
विशेष म्हणजे जीबीएस आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णासाठी त्याची बहीण सहा महिन्यांपासून स्वत:चे घरदार व मुलांना सोडून भावासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहे. तिच्या सासरच्या मंडळींनीही तिला मानसिक आधार दिला आहे.
कार्यक्रमात तिच्यासह इतरही भगिनींनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. याच भगिनींमुळे त्यांचे रुग्ण भाऊ बरे होत आहेत. त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि त्यावर त्यांनी केलेली मात, घरच्यांची मिळालेली साथ आणि मनोबल, या अनुषंगाने त्या व्यक्त झाल्या आणि अनेक रुग्ण व नातेवाईकांना प्रेरणा मिळाली. तर, काही भाऊ असे आहेत, जे दिवसा काम करतात आणि रात्री आपल्या भावांच्या सेवेसाठी जागे राहतात. अशा विविध आप्तेष्टांना याच कार्यक्रमात गौरवण्यात आले. त्यांचेही मनोबल अनेकांसाठी प्रेरक ठरले.






