धार्मिक पर्यटनामुळे आदरातिथ्य क्षेत्राला बळ

महाराष्ट्र टाइम्स

धार्मिक पर्यटनामुळे आदरातिथ्य क्षेत्राला मोठे बळ मिळाले आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये पायाभूत सुविधा सुधारत असून हॉस्पिटॅलिटी उद्योगासाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. नागपूरजवळ जंगल आणि व्याघ्रप्रकल्पांमुळे फॉरेस्ट टुरिझम विकसित होत आहे. नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वाढणार आहे. जगभरातील हॉटेल्सचे संचालन नागपुरातून होत आहे.

धार्मिक पर्यटनामुळे आदरातिथ्य क्षेत्राला बळ
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

ईशान्येकडील राज्यांमध्ये हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री वाढविण्यासाठी मोठ्या संधी आहेत. या राज्यांमध्ये चांगले रस्ते, पायाभूत सुविधा होत असून त्याचा लाभ घेत हॉस्पिटॅलिटी क्षेत्र वाढायला हवे, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. दाभा येथील ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटरजवळ ४५० खोल्यांचे पंचतारांकित हॉटेल होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

‘धार्मिक पर्यटनामुळे आदरातिथ्य क्षेत्राला (हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री) नवे बळ प्राप्त झाले आहे. या माध्यमातून हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री वाढत असून यामध्ये भविष्यात प्रचंड संधी आहेत’, अशी माहिती ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांनी शुक्रवारी दिली.

हॉटेलकी प्लॅटफॉर्मने १५ हजारांहून अधिक हॉटेल्स आणि १.५ दशलक्ष खोल्यांचे लक्ष्य गाठल्यानिमित्त येथील हॉटेल रॅडिसन ब्लू येथे विशेष कार्यक्रम झाला. त्यावेळी अग्रवाल बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हॉटेलकी प्लॅटफॉर्मचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष आदित्य त्यागराजन, आयएचजीच्या मुख्य उत्पादन व तंत्रज्ञान अधिकारी जॉली फ्लेमिंग, जी सिक्स हॉस्पिटॅलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोनल सिन्हा, रेडरूफ इनचे मुख्य कार्यकारी अधिकारी झॅक घरिब, अमेरिकेतील हॉटेल व्यावसायिक सॅम पटेल यांची उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अग्रवाल म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांमध्ये धार्मिक पर्यटन वाढले आहे. प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभमुळे केवळ प्रयागराज येथील अर्थव्यवस्था गतिमान झाली नव्हती. तर, वाराणसी, अयोध्या असे एक धार्मिक सर्किट तयार झाले होते. पुढील वर्षी नाशिक येथे कुंभमेळा होणार असून त्यानिमित्ताने लगतच्या प्रदेशात एक पर्यटन सर्किट तयार होऊन महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वाढणार आहे. नागपूरनजीकच्या परिसरात असलेले जंगल आणि व्याघ्रप्रकल्पांमुळे हा परिसर ‘फॉरेस्ट टुरिझम’च्या दृष्टीने विकसित होत आहे. यामध्ये अधिक प्रगती करण्याच्या बऱ्याच संधी आहेत.’

६० देशांतील हॉटेलांचे

संचालन नागपुरातून

नागपूरचे जावई असलेल्या आदित्य त्यागराजन यांच्या हॉटेलकी प्लॅटफॉर्मद्वारे जगभरातील सुमारे ६० देशांमधील विविध हॉटेलमधील चेक इन सॉफ्टवेअरचे काम होत आहे. ही कंपनी नागपूरची असून आजघडीला आयटी पार्क येथील कार्यालयात १ हजार कर्मचारी आहेत. हे कर्मचारी दररोज अमेरिकापासून पापुआ न्यू गिनीपर्यंत विविध देशांमधील हॉटेलातून येणारे सुमारे ३ हजार कॉल स्वीकारतात. ही कंपनी जागतिक पातळीवरील एक आघाडीची हॉस्पिटॅलिटी-टेक कंपनी ठरत आहे.