‘भाजप उपरे, दलालांचा पक्ष’

महाराष्ट्र टाइम्स

उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजप आता उपरे आणि दलालांचा पक्ष झाला आहे असे ते म्हणाले. भाजपने पाठीत वार केल्यानेच ते काँग्रेससोबत गेले. अकोटमध्ये एमआयएमसोबत युती आणि अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत जाण्यावर त्यांनी भाजपला प्रश्न विचारले. नाशिकचा विकास करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. राज ठाकरे यांच्यासोबतच्या सभेत त्यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले.

‘भाजप उपरे, दलालांचा पक्ष’
नाशिक : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर ( भाजप ) जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपचे हिंदुत्व हे केवळ निवडणुकीपुरते असून, हा पक्ष आता बाहेरच्या, दलाल आणि उपटसुंभांचा झाला आहे, असे ते म्हणाले. सत्तेसाठी भाजप रावणालाही पक्षात घेईल, अशी टीका त्यांनी केली. भाजपच्या पाठीत खंजीर खुपसल्यामुळेच आपण काँग्रेससोबत गेलो होतो, असे स्पष्टीकरण देतानाच, भाजपने अकोटमध्ये एमआयएमसोबत युती केली, तर मिंधेंना बाजूला ठेवण्यासाठी अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत गेले, तेव्हा तुमचे हिंदुत्व कुठे गेले, असा सवाल ठाकरेंनी केला. नाशिकचा विकास करण्यासाठी आपण आणि राज ठाकरे एकत्र आलो आहोत, ही आपली गॅरंटी आहे, बोगस मोदी गॅरंटी नव्हे, असेही त्यांनी सांगितले. नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा घेतली.

या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. 'भ्रष्टाचारी तेतुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा' अशी टीका करत, देवेंद्र फडणवीस यांनी हे शहर दत्तक घेतले होते, असे ते म्हणाले. राज ठाकरे यांच्यासोबत बोलताना, ज्यांना राजकारणात मुले नाहीत, त्यांना आमची मुले दत्तक घ्यावी लागतात, असे उपहासाने म्हणाले. हे काय शहर दत्तक घेणार? म्हणून मोहन भागवतांना टाहो फोडावा लागतोय, की अपत्य वाढवा. अपत्य वाढवा म्हणजे तुमच्या राजकारणातले अपत्य वाढवा. त्यांचे तेवढे तरी ऐका, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
आमचे व्यासपीठ हाऊसफुल आहे. आमच्याकडे मुलांची कमी नाही. मोठे केलेले गेले असतील, पण ज्यांनी मोठे केले ती माणसे सोबत आहेत, असे ठाकरे म्हणाले. आम्ही एकत्र आल्यानंतर ज्यांनी फटाके फोडले, दुसऱ्या दिवशी तेच तिकडे गेले, अशी टीका ठाकरे यांनी केली. नाशिकचा विकास करण्यासाठी आपण आणि राज ठाकरे एकत्र आलो आहोत, ही आपली गॅरंटी आहे, बोगस मोदी गॅरंटी नव्हे, असेही त्यांनी सांगितले.