मराठी भाषा विभागाची संलग्न संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने मंगळवारी विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीमध्ये मराठी भाषा विभाग असा संदर्भ देताना भाषा या शब्दातील ‘ष’ पोटफोड्याऐवजी शेंडीफोड्या देण्यात आला. यामुळे मराठी भाषा विभागावर आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर ताशेरे ओढले जात आहेत. हा संतापजनक प्रकार असल्याची प्रतिक्रिया मराठी भाषा अभ्यासकांमध्ये उमटली आहे.
‘मराठी भाषा विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जाहिरातीमध्ये भाषा या शब्दामध्येच चूक कशी होऊ शकते,’ असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. भाषा या शब्दावरून खिल्ली उडवत ‘मराटी भाशेचे भविश्य ऊज्ज्वल आहे,’ अशी उपहासात्मक प्रतिक्रिया अनेक समूहांवर उमटली. ‘हे भयानक असून भाषा विभागामध्ये अनेक तज्ज्ञ असताना आणि मराठी भाषा विभागाला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना अशा चुका प्रसिद्ध कशा होऊ शकतात,’ अशी विचारणा करण्यात येत आहे.
‘ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी, डोळेझाक करण्यासारखी निश्चितच नाही,’ असा संताप मराठीच्या व्यापक हितासाठीचे प्रमुख संयोजक श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केला. ‘सरकारच्याच भाषा, साहित्य, संस्कृतीविषयक व तज्ज्ञांच्याच संस्था, मराठीबाबत एवढी घोर उदासीनता बाळगत असतील, तर सरकारच्या राजभाषा अधिनियम व मराठी लेखनाबाबतच्या नियमांचे पालन करण्याची दक्षता घेण्यास सांगणाऱ्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणार कोण,’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ‘लिहिताना चुका होऊ शकतात. म्हणूनच संबंधित मजकूर लिहिणाऱ्यांनी तो प्रसृत करण्याआधी किमान जाणकाराकडून तपासून तरी घेण्याची सवय लावून घ्यायला हवी,’ असेही ते म्हणाले.






