‘उद्याच्या शहरा’साठी, आज करा मतदान

महाराष्ट्र टाइम्स

महापालिका निवडणुका आज होत आहेत. पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी मतदान करणे महत्त्वाचे आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी नागरिकांना मतदानाचे आवाहन केले आहे. मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य आहे. योग्य उमेदवार निवडून शहराचे भविष्य घडवावे. जबाबदार नागरिक म्हणून मतदान करणे आवश्यक आहे.

‘उद्याच्या शहरा’साठी, आज करा मतदान
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता या आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या सुविधा ज्या शहरात उत्तम असतील, ते शहर राहण्यासाठी सर्वोत्तम असते, असे मानले जाते. या सर्व मूलभूत बाबी ज्या यंत्रणेशी निगडीत आहेत, त्या महापालिकांच्या निवडणुका आज, गुरुवारी होत आहेत. त्यामुळेच ‘आपले शहर, आपली कर्मभूमी आणि आपल्या भविष्यासाठी मतदान ’ हा संदेश देत मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मतदान हा केवळ सुट्टीचा दिवस नसून तो आपला हक्क, कर्तव्य बजावण्याचा दिवस आहे, असे ठळकपणे सांगणारे हे कलाकार स्वतः शूटिंगच्या धावपळीतून वेळ काढून आवर्जून मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

अभिनेता शशांक केतकर नेहमीच शहरातील समस्यांवर उघडपणे मत व्यक्त करत असतात. ‘माझं शहर, माझं राज्य आणि माझा देश या सगळ्यांसाठीच मला मतदान करायचे आहे. परंतु शहरात विकासाच्या नावाखाली सुरू असणारी गोंधळाची कामे थांबायला हवीत. आधी रस्ता खणतात, पाण्याची लाइन टाकतात, मग बुजवतात पुन्हा विजेची, गॅसची लाइन म्हणून खड्डे खणले जातात. त्यामुळे रस्त्याचा स्तर वर-खाली होतो आणि मग म्हणायचे की आता रस्ता नीट करूया. हे सगळे कुठेतरी थांबवले पाहिजे. शाळा, हॉस्पिटल आणि स्वच्छता यांवर ठोस लक्ष दिले पाहिजे,’ असे मत त्यांनी मांडले. तसेच, ‘महानगरपालिकेची प्रत्येक गोष्ट ही सार्वजनिक मालमत्ता आहे आणि तिची नासधूस करणे चुकीचे आहे,’ याकडेही त्यांनी लक्ष वेधून नागरिकांनीही जबाबदार नागरिक व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

‘आपण आपले शहर स्वच्छ, चांगले ठेवूया आणि जगासमोर या शहराची प्रतिमा चांगली करूया. रंग, रूप, जात आणि वर्ण यांच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगायला शिकणे, आज फार गरजेचे आहे. आपल्या शहरासाठी, आपल्या भविष्यासाठी जबाबदारीने वागणे हाच खरा मतदानाचा अर्थ आहे,’ अशा शब्दांत अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले.

अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी मतदानाकडे कर्तव्य म्हणून पाहण्याचे आवाहन केले. ‘मतदान हा सुट्टीचा दिवस नाही. तो आपला हक्क, कर्तव्य आणि जबाबदारी बजावण्याचा दिवस आहे. शूटिंग किंवा प्रयोग काहीही असो, मी न चुकता मतदान करते आणि मगच कामाला जाते. अनेक कलाकार फक्त मतदानासाठी आपल्या गावाला जातात. ही जाणीव महत्त्वाची आहे,’ असे त्या म्हणाल्या.

अभिनेत्री जुई गडकरी यांनी योग्य निवडीवर भर देण्याचा सल्ला दिला. ‘आपण सतत तक्रारी करतो; परंतु मतदान केल्यावरच त्या करण्याचा आपल्याला नैतिक अधिकार आहे. जे खरोखर समस्या सोडवतील, अशाच लोकप्रतिनिधींना मतदान करा. मुंबई छान राहावी, देश सक्षम व्हावा हीच आपली इच्छा आहे. आमच्यासारख्या व्यग्र वेळापत्रक असणाऱ्या शूटिंगमध्येही मतदानासाठी वेळ मिळतो. मी कर्जतला जाऊन मत करून परत येते. आजचा निर्णय उद्याचे भविष्य ठरवणार आहे,’ हे लक्षात ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन केले. ‘मतदान केवळ औपचारिकतेसाठी नसावे. आपल्या प्रभागासाठी वर्षानुवर्षे काम करणारा, खरे बदल घडवण्याची क्षमता असलेला उमेदवार निवडा. शाळा, कॉलेज, रस्ते, पाणी, आरोग्य, स्वच्छता या सगळ्या गरजांचा गांभीर्याने विचार करा. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका. योग्य उमेदवार निवडणे ही जबाबदारी आहे,’ असे त्या म्हणाल्या.

अभिनेता पृथ्वीक प्रताप यांनी राज्यघटनेच्या हक्काची आठवण करून दिली. ‘मतदानाचा हक्क राज्यघटनेने आपल्याला दिला आहे, त्यामुळे तो बजावलाच पाहिजे. योग्य उमेदवार निवडून दिला तर प्रश्न विचारण्याची आणि कामे करून घेण्याची ताकद मिळते. प्रत्येक मताची समान किंमत आहे,’ अशा शब्दांत त्यांनी मतदानाचे महत्त्व अधोरेखित करून मतदान करण्याचे आवाहन केले.