युद्ध अन् जगण्याचे पैलू

Contributed byडॉ. जयंत पानसे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

लेखकाला लहानपणी मिळालेल्या टॉलस्टॉय यांच्या 'वॉर अँड पीस' या कादंबरीच्या संक्षिप्त मराठी रूपाचा अनुभव सांगितला आहे. नेपोलियनच्या रशियावरील युद्धाची पार्श्वभूमी आणि त्यातील पात्रे, त्यांचे अनुभव यावर प्रकाश टाकला आहे. जीवनातील कटू सत्ये आणि आनंद या दोन्ही बाजूंची जाणीव करून देणारी ही कादंबरी आहे. जीवनावरील श्रद्धा आणि प्रेम यावर भर दिला आहे.

युद्ध अन् जगण्याचे पैलू

उंट लिओ टॉलस्टॉय मला भेटले तेव्हा मी बारा वर्षांचा होतो. माझ्या मुंजीमध्ये माझ्या वडिलांचे नाशिकचे मित्र माधव लिमये यांनी मला आहेर म्हणून भा. रा. भागवतांची पुस्तकं आणि त्यात टॉलस्टॉय यांच्या ‘वॉर अँड पीस’ या कादंबरीची संक्षिप्त आवृत्ती भेट दिली होती. भागवतांविषयी आपण काय लिहिणार? ते सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहेत; पण टॉलस्टॉय यांच्या ‘वॉर अँड पीस’चं मराठी भाषांतर संक्षिप्त कादंबरी रूपानं माझ्या हाती पडलं. संक्षिप्त म्हणजे फक्त ३९ पानांचं आणि लिहिणारे होते, श्रीदत्त आपटे. साधारण १९६०च्या दशकात मी ही कादंबरी वाचत असताना त्या वयात मी खूप भारावून गेलो. त्या वेळी रशिया किंवा कादंबरीतल्या ऐतिहासिक पात्रांचा काहीही परिचय नव्हता. मात्र, महाभारतानंतर माझ्यावर आजतागायत आपटे यांनी केलेल्या त्या छोटेखानी भाषांतरित कादंबरीचा खोलवर परिणाम झाला.

खरं म्हणजे ‘वॉर अँड पीस’ ही कादंबरी रशियामधल्या सन १८०५ ते सन १८२० या १५ वर्षांच्या कालखंडाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर लिहिलेली आहे. तत्कालीन फ्रान्सचा सर्वेसर्वा सम्राट नेपोलियन बोनापार्ट यानं राज्यविस्ताराच्या महत्त्वाकांक्षेपायी युरोपात पूर्वेकडे चढाई करत रशियाही गिळंकृत करायचा म्हणून केलेली लढाई; पण या लढाईमध्ये रशियाची राजधानी मॉस्को जिंकूनसुद्धा नेपोलियन बोनापार्टला प्रचंड विस्तारत असलेला रशिया काही ताब्यात ठेवता आला नाही आणि तो तिथूनच परत गेला. त्याला मॉस्को जिंकण्याचं समाधान काही मिळालं नाही; म्हणूनच भाषांतरकार श्रीदत्त आपटे यांनी त्याचं नाव ‘पराभूत जय’ असं ठेवलं असावं.


युद्ध अन् जगण्याचे पैलू

मूळ रशियन कादंबरी ‘वॉर अँड पीस’ खूप मोठी आहे, असं म्हणतात. सुमारे २००० पानांची. या रशियन भाषेतील कादंबरीची नंतर जगभरातल्या अनेक भाषांत भाषांतरं झाली. माझा इंग्रजी वाड्मयाशी परिचय होईपर्यंत आपटे यांनी भाषांतरित केलेली ‘पराभूत जय’ एवढीच कादंबरी आहे असं वाटायचे; पण नंतर पुण्याच्या ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीत मी त्याचा चौदाशे पानी इंग्रजी भाषांतर वाचलं, तेव्हा मूळ कादंबरीच्या विस्ताराची कल्पना आली. टॉलस्टॉय यांच्या या कादंबरीत एकूण पंधराशे पात्रं आहेत. आपटे यांनी कादंबरीच्या आशयाला अनुरूप मोजकी व्यक्तिचित्रं घेतली आहेत. मूळ कादंबरीमध्ये आपल्याला न कळणारे काही रशियन संदर्भ आहेत, ते मराठी भाषांतरात गाळलेले आहेत.

रूढार्थानं बघता ‘वॉर अँड पीस’ ही कदाचित फक्त ऐतिहासिक युद्धकथा वाटेल; कारण त्यातली पात्रं, त्यांचे स्वभाव आणि मनुष्य स्वभावाचे विविध कंगोरे आणि त्यावर होणारे भौगोलिक, सामाजिक आणि आर्थिक परिणाम हे टॉलस्टॉय यांनी चपखलपणे नोंदवले आहेत. काउंट पेरी हे त्यातलं मुख्य पात्र. त्याच्या दृष्टीतूनच जवळजवळ आपण हा कादंबरीचा कालखंड बघत असतो. पेरी हा एका सरदाराचा प्रचंड संपत्ती वारसाहक्कानं मिळालेला एक अनौरस मुलगा. त्याला कोणी नातेवाइक नाहीत; पण त्याच्या संपत्तीमुळे आणि राजकीय संबंधांमुळे सगळे लोक त्याच्याशी जवळीक साधू बघतात. प्रेम, जिव्हाळा, खंत, खेद, ईर्ष्या, मत्सर, लोभ, शौर्य, विश्वासघात, निराशा, हतबलता आणि हताशा अशा अनेक भावनांमधून ही कादंबरी प्रवास करते.

रशियातल्या अति थंड हिवाळ्यामुळे सम्राट नेपोलियन बोनापार्टला हे युद्ध आटोपतं घ्यावं लागतं आणि तो फ्रान्सकडे परत जायला निघतो. या लढाईमध्ये अनेक निरपराध धारातीर्थी पडतात. काउंट पेरीला असं वाटत असतं, की तो दिसायला चांगला नसल्यामुळे त्याच्याकडे कुणी बघणार नाही; किंबहुना एका ऐशोआरामी स्त्रीशी लग्न करून तो फसलेला असतो. अशात त्याच्यापेक्षा वयानं बरीच लहान असलेली नताशा त्याला समजून घेते आणि त्याच्याशी लग्न करायची इच्छा व्यक्त करते आणि कादंबरीचा शेवट होतो.

शेवटी पेरी नताशाला म्हणतो, ‘यातना, मृत्यू, लढाया ही जीवनातली कटू सत्यं मान्य केली पाहिजेत, हे मी शिकलो. शांतता, जन्म, आनंद ही मानवी जीवनाची दुसरी विलोभनीय बाजू आहे याचीही जाणीव झाली. सर्वांत अवघड; पण आवश्यक गोष्ट म्हणजे जीवनावर आढळ आणि निरागस प्रेम! अत्यंत यातनांतही मनुष्य जीवनावर प्रेम करतो; कारण जीवन हेच जगाचं सार, सर्वस्व आहे. जीवनावरील श्रद्धा हीच परमेशरावरील श्रद्धा आहे. जो जीवनावर प्रेम करतो तोच खरा ईश्वरावर प्रेम करतो.’ आपटे यांनी भाषांतरित केलेल्या ‘वॉर अँड पीस’ या टॉलस्टॉय यांच्या कादंबरीचं सुंदर मराठी व वाचनीय रूप इंटरनेटवर उपलब्ध आहे.