अंबरनाथ पालिका निवडणुकीनंतर विशेषतः शिवसेना पक्षाच्या नवनियुक्त नगरसेवकांकडून आपापले प्रभाग स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता मोहिम हाती घेतली जात आहे. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पूर्व व पश्चिम भागांत अनेक नगरसेवकांकडून राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेचे स्वागत होत असले तरी, ही मोहीम सातत्य राखणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अंबरनाथ नगर परिषद येथे गेली पाच वर्षे प्रशासकीय राजवट होती. त्यामुळे अनेक प्रभागांतील समस्या व अस्वच्छतेबाबत दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत होत्या. निवडणुकीनंतर नव्याने निवडून आलेले लोकप्रतिनिधी मात्र सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. अंबरनाथ पूर्वेतील प्रभाग क्रमांक १९ मधून निवडून आलेले शिवसेनेचे नगरसेवक निखिल चौधरी यांनी सर्वप्रथम आपल्या प्रभागात नियमित स्वच्छता मोहीम सुरू केली. त्यानंतर कुणाल भोईर, माजी नगरसेवक उमेश गुंजाळ, अजय मोहरीकर, दिलीप आढाव आदी नगरसेवकांनीही नागरिकांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवली.
काही सामाजिक संस्थांच्या स्वच्छता उपक्रमांत नगराध्यक्षा तेजश्री करजुले पाटील यांनीही सहभाग घेतला. अनेक ठिकाणी कचरा कुंड्यांची जागा स्वच्छ करून तेथे फुलझाडांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावरही या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून नगरसेवकांमध्ये ‘स्वच्छ प्रभाग’ स्पर्धा पाहायला मिळत आहे. मात्र, ही मोहीम एकदिवसीय सोहळा न ठरता सातत्याने राबवावी, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.









