जळगावात हवेत गोळीबार

Contributed byपोलिस अधीक्षक|महाराष्ट्र टाइम्स

जळगावात महापालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान पिंप्राळा परिसरात हवेत गोळीबार झाला. मिस्त्री कामाच्या पैशांच्या वादातून हा प्रकार घडला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, निवडणुकीशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. संशयित तुषार सोनवणे याने मुस्तफावर गोळीबार केला. पोलिसांनी घटनास्थळी बंदुकीची रिकामी पुंगळी जप्त केली आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जळगावात हवेत गोळीबार
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

जळगावात गुरुवारी (दि. १५) महापालिका निवडणुकीसाठी मतदान होत असताना दुपारी पिंप्राळा परिसरात हवेत गोळीबार केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही. मिस्त्री कामाच्या पैशाच्या वैयक्तिक वादातून हा प्रकार झाल्याचे समोर येत आहे. घटनास्थळी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी भेट दिली असून, या प्रकाराचा निवडणुकीशी संबध नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

या घटनेतील संशयित तुषार सोनवणे याचे मिस्त्री कामाचे अंदाजे एक लाख ७० हजार रुपये मुस्तफा याच्याकडे थकलेले होते. वारंवार मागणी करूनही मुस्तफा पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. गुरुवारी मतदानाच्या दिवशी आनंद मंगल सोसायटी येथील हनुमान मंदिराजवळ मुस्तफा आणि तुषार सोनवणे हे समोरासमोर आले. यावेळी पैसे देवाणघेवाणीचा वाद पुन्हा उफाळला. संतापलेल्या तुषार सोनवणे याने गुरुवारी मुस्तफावर गोळीबार केला. घटनास्थळी पोलिसांना बंदुकीची रिकामी पुंगळी सापडली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड व रामानंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादी मुस्तफा याने रामानंदनगर पोलिस स्टेशन गाठले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.